डेटावर परिणामाची विचारणा
नवी दिल्ली :- गेल्या आठवड्यात भारतासह जगभरातील बड्या लोकांची ट्विटर खाती हॅक करण्यात आली होती. यामुळे जगभर खळबळ उडाली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने ट्विटरकडे नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे.
देशातील माहिती यंत्रणेच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारने इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजे सीईआरटी- इन ही यंत्रणा निर्माण केली आहे. सीईआरटी- इनने ट्विटरच्या व्यवस्थापनाला यासंदर्भात विचारणा केली आहे. भारतातील किती लोकांची ट्विटर खाती हॅक झाली. त्याचबरोबर ट्विटरकडे खातेदाराच्या असलेल्या वैयक्तिक माहितीवर काय परिणाम झाला, याची माहिती सादर करण्यास सांगितले आहे. यावेळी भारतातील किती खातेदारांनी ट्विटरवरील फसवणूक करणाऱ्या साईटला भेट दिली. त्यामुळे किती भारतीयांचे नुकसान झाले. यासंदर्भात ही माहिती मागविण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.
ही घटना घडल्यानंतर संबंधित खातेदारांना ट्विटरने यासंदर्भात माहिती दिली आहे का? आगामी काळात असा प्रकार होऊ नये यासाठी ट्विटर कोणत्या उपाययोजना करणार आहे? याची माहिती मागविण्यात आली आहे. हल्ला कोणी केला? हल्ला करण्यासाठी कशा प्रकारची यंत्रणा वापरण्यात आली? या संदर्भातील माहिती ट्विटरने जमा केली असण्याची शक्यता आहे. ही माहिती सरकारला उपलब्ध करावी. त्याचबरोबर आगामी काळात असे हल्ले होणार नाहीत, यासाठी ट्विटर काय करणार आहे याची माहिती या नोटिसीत विचारण्यात आली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये जगातील बडे उद्योगपती, चित्रपटातील कलाकार, राजकीय नेते, कंपन्यांचे अधिकारी यांच्या ट्विटर अकाउंटवर सायबर हल्लेखोरांनी हल्ला केला होता. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यामध्ये अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा, अमेरिकेतील अध्यक्षपदाचे डेमॉक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बिडेन, ऍमेझॉन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेजोस, मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांचा समावेश आहे.
ट्विटरकडून स्पष्टीकरण नाही…
केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांकडून यासंदर्भात ट्विटरकडे स्पष्टीकरण मागण्यात आले असण्याची शक्यता आहे. भारत सरकारने ट्विटरला नोटीस पाठविली आहे. यासंदर्भात ट्विटरकडे विचारणा करण्यात आली असता त्यांच्याकडून यासंदर्भात कसलीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. अशाप्रकारे ट्विटरचा दुरुपयोग झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. त्यामुळे ट्विटर यासंदर्भात काही गंभीर उपाययोजना करण्याची शक्यता आहे.