घारगावात बिबट्यांकडून दोन शेळ्यांसह वीस कोंबड्या फस्त

संगमनेर – तालुक्‍याच्या पठार भागातील घारगाव परिसरातील खोबरेवाडी व कडाळेवस्ती येथे दोन बिबट्यांनी दोन शेळ्या व वीस कोंबड्या फस्त केल्या. हा प्रकार शुक्रवारी उघडकीस आली आहे. त्यामुळे परिसरात बिबट्यांच्या दहशतीने भीती पसरली आहे.

पठारावरील घारगाव परिसरात खोबरेवाडी येथे नवनाथ लक्ष्मण गाडेकर यांचे शेत आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास बिबट्या शिवारात शिरला. शेतात असलेल्या शेळीवर हल्ला करून तिचा फडशा पाडला. त्याच दिवशी रात्री दीड वाजेच्या सुमारास बिबट्या तुकाराम सदाशिव गाडेकर यांच्या वस्तीजवळ आला.

तेथे गोठ्यात असलेल्या एका शेळीवर हल्ला करून तिला ठार केले. मध्यरात्रीच्या सुमारास येथील कडाळेवस्तीत दोन बिबटे मच्छिंद्र शिवाजी केदार यांच्या कोंबड्यांच्या खुराड्यात घुसले. तसेच वीस कोंबड्या फस्त केल्या. बिबट्याचे लहान व मोठे ठसे आढळल्याने दोन बिबटे असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. दरम्यान, शेतमालकांनी वनपाल आर. के. थेटे यांना घटनेची माहिती दिली असता, वनरक्षक एस. बी. धानापुणे, दिलीप बहिरट यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.