प्रधानमंत्री आवास योजना : अनामत रक्कम परत करण्याची मागणी
चऱ्होली – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील नागरिक अर्जदारांकडून अर्ज करण्यात आले होते. परंतु सोडत झाल्यानंतर घर न मिळालेल्या अर्जदारांची अनामत रक्कम पालिकेने लवकरात लवकर अर्जदारांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी स्वीकृत प्रभाग सदस्य संजय वाबळे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
प्रधानमंत्री आवाससाठी ऑगस्ट, ऑक्टोबर 2020 दरम्यान 47878 अर्ज करण्यात आले होते. त्या समवेत डी.डी. रुपये 5000 जमा करण्यात आला होता. त्यातील पात्र अर्जदारांची माहे फेब्रुवारी 2021 मध्ये काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये घर न मिळालेल्या एकूण 44214 अर्जदारांची अनामत रक्कम रुपये 5000 घेतलेली परत करावी.
घर न मिळालेले एकूण अर्जदारांची अनामत रक्कम अंदाजे 22 कोटी 10 लाख रुपये पालिकेच्या तिजोरीत पडून आहेत. नियमानुसार अपात्र अर्जदारांना ही रक्कम लवकरात लवकर परत मिळावी. करोनाच्या या आर्थिक बिकट परिस्थितीत नागरिकांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी स्वीकृत नगरसेवक संजय वाबळे यांनी पत्राद्वारे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.