छावणीचालकांना 13 कोटींच्या अनुदानाची प्रतीक्षा
नगर – मागील वर्षी दुष्काळात सुरु केलेल्या चारा छावण्यांना ऑगस्टपर्यंत 317 कोटी रूपये प्राप्त झाले होते. त्यातील 316.50 लाखांचे वितरण झाले आहे. केवळ 50 लाखांचे वितरण वितरण होणे बाकी आहे.तर,दुसरीकडे सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातील 13 कोटींचे अनुदान शासनाकडे मागितले होते. मात्र ते अद्यापही प्राप्त न झाल्याने संबंधीत छावणीचालकांना अनुदानाची प्रतिक्षा करावी लागत आहे.
मागील वर्षी जिल्ह्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने शासनाला अनेक ठिकाणी चारा छावण्या व टॅंकर सुरु केले होते.मात्र यावर्षी ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या हंगामात मार्च सुरु होऊनही चारा छावण्या सुरु करण्याबाबत प्रशासनाला अजून तरी उपाययोजना करण्याची आवश्यकता पडलेली नाही. यावर्षी चारा छावण्या सुरु होण्याची शक्यता खूपच कमी असून टॅंकरची आवश्यकताही ठराविक तालुक्यातच शेवटच्या टप्प्यात लागू शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
दरम्यान, मागील वर्षीच्या छावण्या व टॅंकर प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्र्यांसमोर नियोजन समितीच्या बैठकीत केला होता. पालकमंत्री तथा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यात काही घोटाळा आढळला त्याची जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
मात्र अद्याप अशी चौकशी सुरु झाल्याची जिल्हा प्रशासन पातळीवर कोणतीही परिस्थिती दिसत नाही. त्यावेळी भाजपचे सरकार होते. तसेच तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे हे पवार यांचे विरोधी उमेदवार होते. या सर्व पार्श्वभूमीवर चारा छावण्या व टॅंकर घोटाळ्याच्या चौकशीतून काय बाहेर निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.