पुण्यात नवे कराेनाबाधित एकवीसशेवर, चाचण्यांचाही उच्चांक

मागील पंधरवड्यात एकाच दिवशी करोनामुक्तांचाही आकडा सर्वाधिक

पुणे – शहरात करोना बाधित संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी बाधितांच्या संख्येने तब्बल दोन हजारांच्या पुढे मजल मारली असून, 2 हजार 120 बाधित नव्याने सापडले आहे. यामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे करोनामुक्त झालेल्यांची संख्या 1 हजार 883 पर्यंत आहे. मागील पंधरा दिवसांत एकाच दिवसांत करोनामुक्त झालेल्यांची ही सर्वाधिक संख्या ठरली आहे.

 

रविवार आणि सोमवारी चाचण्यांची संख्या कमी झाल्यामुळे मंगळवारी बाधितांची संख्या तब्बल तीनशे ते चारशेने कमी झाली होती. मात्र, बुधवारी चाचण्यांची संख्या सर्वाधिक झाली असून, दोन दिवसातील प्रतीक्षेत असलेले अहवाल आल्यामुळे नव्या बाधितांची संख्या एकवीसशेवर पोहचली. दिवसभरात 7 हजार 162 संशयिताची तपासणी करण्यात आली.

 

तर आतापर्यंत तब्बल साडेपाच लाख संशयितांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये 1 लाख 24 हजार 568 जणांन करोनाची लागण झाली आहे. त्यातील आतापर्यंत 1 लाख 3 हजार 978 बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. शहरात सध्या 17 हजार 672 बाधित सक्रिय असून, त्यातील 936 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील 480 बाधितांना व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे, तर 456 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

 

मृतांचा आकडा 3 हजारांचा टप्पा गाठणार

मागील पंधरा दिवसांपासून शहरात दररोज 60 ते 65 जणांचा करोनामुळे मृत्यु होत असल्याची नोंद आहे. त्यामध्ये शहर हद्दीसह ग्रामीण आणि अन्य जिल्ह्यातून शहरात उपचारासाठी आलेल्यांचा समावेश आहे. मात्र, केवळ शहर हद्दीतील मृतांची संख्या पाहिली तर दररोज 40 ते 45 च्या आसपास आहे. आजही (दि. 16) 65 जणांच्या मृत्युची नोंद झाली असून, त्यामध्ये शहर हद्दीतील 43 तर अन्य 22 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 2 हजार 918 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला असून, येत्या दोन दिवसांत मृतांची संख्या तीन हजारांचा टप्पा पार करण्याची भीती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.