प्रभात वृत्तसेवा पुण, दि. 16 -महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या हिरवळीवर असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यासाठी महापालिकेने पुतळ्याशेजारी पंधरा ते 20 लाख रुपयांचा खर्च करून हायड्रोलिक शिडी उभारली. मात्र, ती चुकीच्या पद्धतीने बसविल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे हार घालण्यासाठी अग्निशमन दलाची उंच शिडी असलेली ब्रांटो गाडी बोलविण्याची वेळ महापालिका प्रशासनावर येते. तथापि, वाया गेलेल्या खर्चाला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या समोरील उद्यानाचे 2018-19 मध्ये नूतनीकरण करण्यात आले. तेथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुतळा आहे. या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यासाठी यापूर्वी मागील बाजूस शिडी होती. या शिडीवर चढून हार घातला जात होता. मात्र, उद्यानाच्या नूतनीकरणात या ठिकाणी नवीन शिडी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सुमारे 15 ते 20 लाख रुपये खर्चून हायड्रोलिक शिडी उभारण्यात आली.
या शिडीने पुतळ्याजवळ जाऊन हार घालणे शक्य होईल, असे भासविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात ही शिडी पुतळयापासून तीन ते चार फूट अलीकडे आहे. तसेच पुतळ्यापेक्षा कमी उंचीची आहे. त्यामुळे शिडी वर गेल्यानंतर पुतळ्याच्या बाजूला जाण्यासाठी चार फुटांचा एक प्लॅटफॉर्म पुढे सरकावला जातो. त्याला वजन सहन व्हावे म्हणून या प्लॅटफॉर्मच्या बाजूला तीन कर्मचारी उभे करावे लागतात. त्यानंतर हार घालणाऱ्यांना पुतळ्यावर हार फेकावा लागतो. अशी कसरत केल्यानंतरही हार पुतळ्याच्या गळ्यात पडेल की नाही, याची शास्वती नसते. त्यामुळे ही कसरत टाळण्यासाठी दोन वर्षांपासून शिडीचा वापर थांबविण्यात आला आहे.
अकरा कोटींच्या गाडीचा वापर
महापालिकेने लाखो रूपये खर्च करून उभारलेली ही शिडी कुचकामी ठरल्याने स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महापालिकेचा वर्धापनदिन अशा कार्यक्रमांसाठी पालिका प्रशासन तब्बल 11 कोटी किमतीची अग्निशमन दलाची ब्रांटो गाडी मागविते. ही गाडी वास्तविक पाहता शहरात उंच ठिकाणी आग लागल्यावर वापरणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत ही शिडी चक्क पुतळ्यांना हार घालण्यासाठी वापरण्याची वेळ आली आहे.