शहापूरजवळ वीस लाखांचा गुटखा जप्त

तालुका पोलिसांची कारवाई; गोदामात पोहोचण्याआधीच कारवाई

सातारा – कर्नाटकातून आलेला सुमारे वीस लाख रुपयांचा गुटखा साताता तालुका पोलिसांनी जप्त केला. गुटख्याची वाहतूक करणारा टेम्पो जप्त करून पोलिसांनी राहुल वामन माने (रा. शहापूर, ता. सातारा) याला अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी, शहापूर (ता. सातारा) येथील राहुल माने हा गुटखा विकत असल्याने तालुका पोलीस ठाण्याचे पथक त्याच्या पाळतीवर होते. माने हा कर्नाटकातून गुटखा घेऊन गुरुवारी शहापूरला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकार यांना मिळाली. त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाई करण्याचा आदेश दिला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी शहापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रत्येक वाहनाची तपासणी सुरू केली.

त्यावेळी एक टेम्पो (एमएच-11-एएल-3653) पोलिसांनी तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पुढे जात पर्यायी रस्ता शोधला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता त्यात गुटखा व सुंगधी तंबाखूच्या पुड्या सापडल्या. अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून टेम्पोत गुटखा असल्याची खात्री केल्यावर पोलिसांनी वीस लाख रुपयांचा गुटखा व टेम्पो, असा 25 लाख 28 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

राहुल माने याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने राहुल माने यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार दादा परिहार, राजू मुलाणी, सुजित भोसले, रमेश चव्हाण, संदीप कुंभार, अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाचे अनिल पवार यांनी ही कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक वर्षा देसाई तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.