चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे!

ठेकेदारावर आरोप ः चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी
पिंपरी –  शहराला चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे काम निगडी प्राधिकरण भागात सुरू असून, मागील तीन वर्ष विश्‍व इन्फ्रास्टक्‍चर ही ठेकेदार संस्था काम करीत आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे होत असून, त्याला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची साथ मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजेश फलके यांनी केला आहे. याबाबत त्यांनी आयुक्‍तांना निवेदन दिले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून, या कामाची निविदा 143 कोटी रुपयांची आहे. या ठेकेदार संस्थेकडून कामामध्ये कसूर केला जात असल्याचा आरोप फलके यांनी केला आहे. प्राधिकरणात सुरू असलेल्या कामाबरोबरच सेक्‍टर 28 व इतर भागामध्ये नळजोड देण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामामध्ये पाण्याच्या मीटरला जोडला जाणारा पाईप हा निकृष्ट दर्जाचा आहे. तसेच हा पाईप जमिनीखाली किमान 0.3 मी ( 12 इंच ) असावा असे निर्देश आहेत.मात्र, हा पाईप जमिनीखाली केवळ 0.1 ते 0.15 मी च ( 4 ते 6 इंच ) गाडला जात आहे. त्यामुळे पाण्याचा दबाव कमी होत आहे. त्यामुळे हे काम होऊनही पुरेशा दाबाने नागरिकांना पाणी मिळणार नाही.

ही बाब कनिष्ठ अभियंता प्रणिती मंगल यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर, त्यांनी “शेड्यूल “ब’ दिले नसल्याने मला नियम माहीत नाहीत, तसेच मोजणी व बिल बनवण्याची जबाबदारी माझी नाही. तुम्हाला ज्यांनी माझा नंबर दिला आहे, त्यांच्याकडूनच लडकत साहेबांचा नंबर घ्या आणि त्यांनाच फोन करा’, अशी बेजबाबदार उत्तरे दिली असल्याचा ही आरोप करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार आणि पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांची चौकशी करुन, कारवाई करण्याची मागणी आयुक्‍तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.