सोमाटणे – येथील बस थांब्यावर स्त्री जातीचे अर्भक आढळले. शिरगाव येथे सोमवारी (दि.10) रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी संतोष गोपाळे (रा. शिरगाव, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष हे शिरगावात मारुती मंदिराजवळ राहतात. त्यांच्या घरापासून काही अंतरावर आमदार बाळा भेगडे निवारा शेड बस थांबा आहे. रविवारी रात्री मावळ भागात जोरदार पाऊस झाला होता. त्यामुळे परिसरात खड्ड्यांमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले होते. संतोष रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले. ते घरापासून काही अंतर चालत पुढे आले. बस थांब्याजवळ आले असता त्यांना लहान बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी आजूबाजूला पाहिले असता कोणीही दिसले नाही. बस थांब्यामध्ये जाऊन पाहिले असता बस थांब्यामध्ये फरशीवर साचलेल्या पाण्यात एका पातळ कापडात गुंडाळले एक स्त्री जातीचे 25 ते 30 दिवसांचे बाळ दिसले.
संतोष यांनी तात्काळ शिरगावचे पोलीस पाटील आणि उपसरपंच यांना याबाबत माहिती दिली. बाळ पाण्यात असल्याने ते थंडीमुळे रडत होते. संतोष यांनी आपल्या घरातून मुलीचे कपडे आणून बाळाला घातले. तसेच उपसरपंचांनी दूध आणून बाळाला पाजले. त्यानंतर सर्वांनी मिळून तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवून घेतला. बाळ ससून येथील अनाथ बालकाश्रमात दाखल करण्यात आले आहे.