पंचवीस दिवसांचे अर्भक जाळले

संभाजीनगरमधील धक्कादायक घटनेने खळबळ

सातारा – संभाजीनगर येथील यशवंत व अहिरे कॉलनी परिसरातील सर्वोदय अपार्टमेंटच्या पार्किंगलगतच्या मोकळ्या जागेत चादरीत गुंडाळलेले पंचवीस दिवसाचे पुरूष जातीचे अर्भक जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात कलम 318 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र किसन शिंदे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली असून या घटनेने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस सूत्रांकडून व फिर्यादीकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील सर्वोदय अपार्टमेंटच्या पार्किंगलगत असणाऱ्या मोकळ्या जागेत तेथील जमा झालेला कचरा जाळण्यासाठी काही महिला जमा झाल्या होत्या. तेथूनच काही अंतरावर एका जळालेल्या चादरीतून मानवी पाय बाहेर आलेला दिसल्याने महिलांनी घाबरून त्याची माहिती इतरत्र दिली. तेथील लोकांनी जवळ जाऊन पाहिले असता पुरूष जातीचे साधारण पंचवीस दिवसाचे अर्भक चादरीत गुंडाळलेल्या अवस्थेत जाळण्यात आल्याचे दिसून आले.

या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन तेथील रहिवाशी रविंद्र किसन शिंदे यांनी फिर्याद दिली. शहर पोलिस ठाण्याचा फौजफाटा तात्काळ दुपारी बारा वाजता घटनास्थळी दाखल झाला. घटनेचा पंचनामा करण्यात येऊन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक अंदाजानुसार अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांना संशय आहे. मृत अर्भक तातडीने जिल्हा रुग्णालयात पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आले. मात्र, या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल शहर पोलिसांनी घेत तपासाची चक्रे गतिमान केली आहेत. अपार्टमेंटच्या पार्किंग क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने ठोस काही धागेदोरे हाती येतील याची शक्‍यता धूसर आहे. पोलीस हवालदार गुलाब जाधव या प्रकरणी तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.