बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या गाजलेल्या “हम’ चित्रपटात “जुम्मा चुम्मा दे दे’ या प्रसिद्ध गाण्यापूर्वी रेकॉर्डिंग रूमबाहेर बसून तब्बल पंचवीस कप चहा पिला होता, अशी आठवण प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले यांनी सांगितली. सोशल मीडियावर चाहत्यांनी त्यावर अनेक गंमतीदार पोस्ट केल्या आहेत. एका वाहिनीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी या चित्रपटासंदर्भात अनेक गंमतीदार किस्से सांगितले.
या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करत त्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. जुम्मा चुम्मा दे दे, या गाण्याबाबतही त्यांनी अनेक किस्से कथन केले. या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी अंतिम तालीम सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झाली होती. तेव्हा मी नवीन होतो.
गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू झाले होते. रेकॉर्डिंग सुरु असलेल्या स्टुडिओच्या शेजारीच आणखी एक स्टुडिओ होता. त्या स्टुडिओत अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. अमिताभ हे मधल्या ब्रेकमध्ये आमच्याकडे येणार होते. ते येणार हे समजल्यावर माझ्यावर प्रचंड दडपण आले. त्या दिवशी मी काहीच खालले नव्हते.
मात्र, गाणे गायचे असल्याने निदान चहा तरी घेऊ असे ठरवले. मात्र, प्रत्यक्षात दडपण जावे यासाठी एक-दोन नव्हे तर मी तब्बल 25 कप चहा पिलो. अमिताभ आल्यानंतर पहाटे 2 वाजता या गाण्याचे रेकॉर्डिंग संपले, असेही त्यांनी सांगितले.