हरभजन सिंगने केले निर्णयाचे समर्थन
नवी दिल्ली –भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आयपीएल स्पर्धेतून घेतलेल्या माघारीच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. परिवाराच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेतला असून या स्पर्धेच्या करारानुसार दोन कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, दोन काय वीस कोटी रुपये मिळणार असतील तरीही यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाही, असे ठाम मत हरभजनसिंगने व्यक्त केले आहे.
मी यावर्षी काही वैयक्तिक कारणांमुळे आयपीएल खेळणार नाही. हा कठीण काळ आहे आणि मला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. चेन्नई संघाला आयपीएलमधील यशासाठी शुभेच्छा. सुरक्षित राहा जय हिंद!, असा संदेश हरभजनने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यापूर्वी सुरेश रैनाने देखील यंदाच्या आयपीएलमधून माघार घेतली होती.
चेन्नई संघाचा सरावाला प्रारंभ
कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यासह चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या खेळाडूंनी सरावाला प्रारंभ केला आहे. करोनाची बाधा झालेल्या दीपक चहर व ऋतुराज गायकवाड वगळता बाकी खेळाडूंनी सराव केला. सरावात सहभागी झालेले खेळाडू तिसऱ्या चाचणीत निगेटिव्ह आल्याने त्यांना सरावाला परवानगी मिळाली होती.
वेळापत्रक आज जाहीर होणार
आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक आज (रविवार) जाहीर होणार आहे. सहभागी संघांशी चर्चा केल्यानंतर या वेळापत्रकाला अंतिम स्वरुप दिले गेले आहे, असे बीसीसीआयचे सदस्य ब्रिजेश पटेल यांनी सांगितले.