बारा वर्षांत केली शतकांची सत्तरी; विक्रमादित्य होणार का?
नवी दिल्ली –आजच्या दिवशी (18 आॅगस्ट 2018) बरोबर बारा वर्षांपूर्वी विराट कोहलीने भारतीय संघातून श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
या बारा वर्षांच्या कारकिर्दीत त्याने जागतिक क्रिकेटचा अनभिषिक्त सम्राट सचिन तेंडुलकरच्या कामगिरीचा पाठलाग सुरू केला असून सचिनच्या शतकांच्या शतकाच्या कामगिरीला मागे टाकण्यासाठी कोहलीला आता केवळ 31 शतकांची गरज आहे. शतकांच्या सत्तरीत पाय ठेवण्याबरोबरच त्याने धावांच्या बाबतीतही सचिनशी स्पर्धा सुरू केली आहे. एकदिवसीय सामन्यांत कोहलीच्या 11 हजार 867 धावा झाल्या आहेत.
सचिनच्या 18 हजार 426 धावा असून कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच एकदिवसीय फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत तो आज पहिल्या स्थानावर आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नेतृत्व सोडल्यानंतर कोहलीकडे 2015 साली कसोटी संघाची तर, 2017 साली एकदिवसीय संघाची धुरा सोपविण्यात आली.
कसोटीत कोहलीच्या 7 हजारांपेक्षाही जास्त धावा आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 7 द्विशतके असून हा देखील एक विक्रम त्याच्या नावावर जमा आहे. सचिनच्या पावलावर पाऊल ठेवत आता तो विक्रमांची एकेक शिखरे पादाक्रांत करत असून लवकरच सचिनलाही मागे टाकेल, अशीच त्याची वाटचाल सुरू आहे.