नियम न पाळणारे बाराच्या भावात…

दुकाने सील, तर काहींवर दंडात्मक कारवाई

पुणे – करोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी पालिकेने सुरू केली आहे. सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या आस्थापनांकडून दंड वसूल करण्यात आला आहे. तर, बंदी असतानाही ग्राहकांना खाद्यपदार्थ तेथेच खाऊ देणारी काही दुकानेही पालिकेने सील केल्याची माहिती अतिक्रमण नियंत्रण विभागाचे प्रमुख माधव जगताप यांनी “प्रभात’ला दिली.

हॉटेल, टपऱ्यांच्या ठिकाणी ग्राहकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, सॅनिटायझर वापरणे बंधनकारक आहे. तसेच हॉटेल तसेच टपरीच्या ठिकाणी केवळ पार्सलची सेवा देण्यास परवानगी आहे. या नियमांची अंमलबजवाणी होते की नाही हे तपसण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्यानंतर अतिक्रमण नियंत्रण विभाग, आकाशचिन्ह आणि परवाना विभागांसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

त्यात, ज्या हॉटेलबाहेर गर्दी आढळली त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला असून, एका दिवसासाठी ही दुकाने सील करण्यात आली. तर दुसऱ्यांदा त्यांच्याकडून पुन्हा नियमांचे उल्लंघन झाल्यास साथरोग कायदा संपेपर्यंत या आस्थापना सील करण्यात येणार आहे. आज केलेल्या कारवाईत पत्र्या मारुती चौक, जंगली महाराज रस्ता, गोखलेनगर, वडारवाडी, धनकवडी गावठाण या भागांत कारवाई करण्यात आली आहे.

…तर तुळशीबागही बंद करणार
तुळशीबागेत गर्दी लक्षात घेऊन व्यावसायिकांनी ग्राहकांना प्रवेश देताना त्यांच्या शरीराचे तापमान तपासून तसेच मास्क असलेल्या ग्राहकांनाच प्रवेश देण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. व्यावसायिकांनी सोशल डिस्टन्सचे नियम ग्राहकांसाठी न पाळल्यास होणारी गर्दी लक्षात घेऊन तुळशीबाग बंद केली जाईल, असा इशारा व्यावसायिकांना दिल्याचे जगताप यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.