कराड नगरपालिकेचे बारा कलमी अभियान

कराड  -कराड तालुक्‍यात मुंबई-पुणे येथून येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कराड शहर ही मध्यवर्ती बाजारपेठ असल्यामुळे शहरात खरेदीसाठी येणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

त्याचबरोबर करोना रुग्णांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. त्यावर लस निघेपर्यंत करोना ही आपली जीवनशैली बनवणे आवश्‍यक आहे. याचा विचार करून कराड नगरपालिकेने नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने बारा कलमी अभियान तयार केले आहे.

या अभियानातील सूचनांचे काटेकोर पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या सर्व कलमांचे काटेकोरपणे पालन केल्यास करोनाचा फैलाव सहजपणे रोखता येऊ शकतो, असेही पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे. नागरिकांना या कलमांची माहिती मिळावी यासाठी शहरात ठिकठिकाणी ते लावण्यात आले असून पालिकेचे कर्मचारी जनजागृतीचे काम करत आहेत.

ही आहेत बारा कलमे
1) दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांची नोंद करावी, त्याने मास्क घातला असेल तरच मालविक्री करावी, आलेल्या ग्राहकांच्या हातावर सॅनिटायझर द्यावे.
2) दुकानात येणारे कामगार करोनाबाधित गावातून येत असल्यास त्यांना तात्पुरती सुट्टी द्यावी.
3) काऊंटरवर गर्दी न करता सोशल डिस्टन्सचे नियम पाळून विक्री करावी.
4) सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्यांनी कडी, कोयंडा, नळ आदी वस्तूंशी कमीतकमी वेळा स्पर्श करावा व त्यांच्या स्वच्छतेची काळजी घ्यावी, यामध्ये काही त्रुटी असल्यास नगरपालिकेशी संपर्क साधावा.
5) भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
6) रस्त्यावरून चालताना एकमेकात अंतर ठेवून चालावे, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नये, हाताचा स्पर्श चेहऱ्याला करणे शक्‍यतो टाळावे.
7) रस्त्यावर वाहन चालवताना पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे.
8) नागरिकांनी गरजेपुरतेच बाहेर पडावे तसेच अनावश्‍यक गर्दी करू नये तसेच कोणाशीही दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळा संपर्क साधू नये.
9) भाजीपाला व फळे घरी आल्यावर दोन तास बाजूला ठेवावीत, त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन ठेवाव्यात.
10) धान्य व वाणसामान आणल्यावर बाजूला ठेवावे व दुसऱ्या दिवशी प्रक्रिया करून डब्यात भरून ठेवावे.
11) सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर थुंकू नये कारण यातून जंतूंचा फैलाव वेगाने होऊ शकतो.
12) दर दोन तासांनी दोन्ही हात साबणाने 20 सेकंद चोळून स्वछ धुवावेत.

Leave A Reply

Your email address will not be published.