शिक्रापूर – वढु बुद्रुक (ता. शिरूर) येथील व्यक्तीस कर्जाचे आमिष दाखवत बजाज इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी काढायला लावत वेळोवेळी कर्जाच्या नावाखाली ऑनलाइन पैसे भरण्यास सांगत तब्बल 12 लाख 29 हजार रुपयांना गंडा घालत फसवणूक केली असल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चार व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
राजाराम भाऊसाहेब भंडारे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. भंडारे यांना मार्च महिन्यात दोन वेगवेगळ्या जणांनी बजाज फायनान्समधून बोलत असून तुम्हाला कर्ज पाहिजे का? असे विचारले व पाच हजार रुपयांची पॉलिसी काढल्यास त्यावर तुम्हाला पाच लाख रुपयांचे कर्ज मिळेल. त्यासाठी कागदपत्रे मागितली. त्यानुसार भंडारे यांनी कागदपत्रे पाठविले असताना रोहित शर्मा नावाने फोन आला व तुम्हाला आठ लाख रुपये कर्ज मिळू शकते, त्यासाठी एका खात्यावर 50 हजार रुपये भरा असे सांगितल्याने भंडारे यांनी कोरेगाव भीमा येथून गाझियाबाद येथील बॅंक खात्यात पैसे भरले. त्यानंतरभंडारे यांना वेळोवेळी फोन करून गाझियाबाद, वेस्ट बंगाल, लखनऊ, उत्तरप्रदेश या ठिकाणच्या वेगवेगळ्या बॅंक खात्यात तब्बल 12 लाख 29 हजार रुपये भरून घेतले. त्यानंतरही भंडारे यांना पैशांची मागणी होत असल्याने त्यांना फसवणूक होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.