Pune gramin | बारा किलो गांजा, साडेतीन लाखांचा गुटखा जप्त ; गुन्हे शाखेची धडक कारवाई

प्रभात वृत्तसेवा
शिरूर – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यात अवैध धंद्यांवर तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून १२ किलो गांजा व तीन लाख ५६ हजार रुपयांचा गुटखा असा एकूण सुमारे पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करीत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. कुलदीप संकपाळ यांच्या नेतृत्वाखालील पथक शिरूर परिसरात गस्त घालत असताना दि. २५ जुलै दोघेजण मोटारसायकलवरून गांजाची विक्री करण्यासाठी आमदाबाद फाट्याकडे येणार असल्याची माहिती मिळाली.शिरूर पोलिसांनी मळगंगा लॉन्सजवळ सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतले.
यात ऐंशी हजार किंमतीचा चार किलो एकशे ८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून मोटारसायकल सह शुभम शंकर मोहीते (वय २९) व विजय केमराज काळे (वय २९) (दोघे रा. टाकळीहाजी) यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत शिरूर येथील गुलमोहर अपार्टमेंट, बुरूड आळी येथे रफिक चाँद शेख (वय ३६, रा. गुलमोहर अपार्टमेंट, शिरूर) याच्या घरावर छापा टाकून वेगवेगळ्या कंपन्यांचा तीन लाख ५६ हजार सातशे ८१ रुपये किंमतीचा गुटखा, तंबाखू व पानमसाला जप्त करण्यात आला.
यामध्ये रफिक चाँद शेख याला अटक करून गुन्हा दाखल केला आहे.तिसरी कारवाई दि. २६ जुलै रोजी रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे (वय ३३, रा. कामाठीपुरा, शिरूर) येथे छापा टाकून त्याच्या घरातून एक लाख २० हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला. आरोपी रमेश उर्फ रमन याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत पो.नि. संदेश केंजळे, स.पो.नि. कुलदीप संकपाळ, स.पो.नि. दीपक कारंडे, पो.स.ई. दिलीप पवार, पो.स.ई. सागर शेळके, पो.हवा तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, नाथसाहेब जगताप, नितीन सुदीक, भाग्यश्री जाधव, अमलदार सागर धुमाळ, सचिन भोई आदींचा समावेश होता.





