जिल्ह्यातील निकाल मिळण्यास लागणार बारा तास

-अंतिम निकाल रात्री उशिरा घोषित होणार
-जिल्हाधिकारी सिंघल; लोकसभा पोटनिवडणूक व आठ विधानसभा मतदारसंघांची आज मतमोजणी, उत्कंठा शिगेला

सातारा – सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक ही जिल्हा प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरली आहे. लोकसभेची पोटनिवडणूक आणि आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी उद्या गुरुवार दि. 24 ऑक्‍टोबर रोजी सातारा येथील एमआयडीसीमध्ये असणाऱ्या शासकीय गोदामांमध्ये सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे.

विधानसभा व लोकसभा मतमोजणी एकदम होणार असल्याने निकालाचे चित्र स्पष्ट होण्यासाठी बारा तासांपेक्षा अधिक वेळ लागणार असल्याचे जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी सांगितले. मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.मतमोजणी आणि पोलीस बंदोबस्त यातील माहिती देण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, निवडणूक आयोगाचे अधिकारी मोनिका ठाकूर सिंग, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, “”सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकाच महिन्यात मतदान आणि मतमोजणी घेण्यात आल्यामुळे ही निवडणूक जिल्हा प्रशासनासाठी आव्हानात्मक ठरली. मतदानाच्या आधी दोन दिवस जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडू लागल्यामुळे मतदान यंत्रे घेऊन जाताना कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली.

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर 22 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करूनही कर्मचारी कमी पडू लागले. तरीही ही शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करून मतदान यंत्रे प्रत्येक मतदान केंद्रांमध्ये पोहोचविण्यात जिल्हा प्रशासनाला यश आले. कर्मचारी कमी पडतील त्याठिकाणी खासगी विद्यालयातील शिक्षक मदतीला घेतले.” सातारा लोकसभेची पोटनिवडणूक आणि सातारा, वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण या सहा विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी उद्या गुरुवार दि. 24 रोजी सकाळी आठ वाजता सातारा “एमआयडीसी’मधील शासकीय गोडाऊनमध्ये सुरू करण्यात येईल. फलटण आणि माण विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी मात्र फलटण आणि दहिवडी या ठिकाणी घेण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

मोजणीच्या एका राउंडला अर्धा तास
सातारा येथील मतमोजणी केंद्रामध्ये एका हॉलमध्ये एका बाजूला लोकसभेच्या पोटनिवडणुकीत दुसऱ्या बाजूला विधानसभेची मतमोजणी सुरू करण्यात येईल. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 14 आणि सातारा- जावळी विधानसभा मतदारसंघासाठी 14, पाटण 12, वाई 14, कोरेगाव 11, कराड दक्षिण 11 आणि कराड उत्तरसाठी 11 टेबलवर मतमोजणी होईल. तर सातारा 31, दक्षिण कराड 30, कोरेगाव 32, वाई 32, पाटण 33 आणि उत्तर कराडसाठी 30 राऊंडमध्ये मतमोजणी होणार आहे.

सफेद कापड असलेल्या टेबलवर लोकसभा आणि लाल कापड असलेल्या टेबलवर विधानसभा मतमोजणी होईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. एका राउंडला साधारण तीस मिनिटे वेळ लागणार असल्याने सातारा लोकसभा आणि विधानसभा निकालाला उशीर लागणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मतदान प्रक्रियेत सुरुवातीला साडेबारा हजार मतांचे पोस्टल बॅलेटची मोजदाद होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.