बारावीची पुस्तके बालभारतीच्या भांडारातून विक्रीसाठी उपलब्ध

गर्दी टाळण्यासाठी पुस्तक विक्रीचे नियोजन

Madhuvan

पुणे  – यावर्षीपासून इयत्ता बारावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके आजपासून ‘बालभारती’च्या सर्व भांडारातून विक्रीसाठी उपलब्ध होत आहे. गर्दी टाळण्यासाठी सुरुवातीला विज्ञान शाखेची पुस्तके उपलब्ध केली असून पुढील दोन दिवसात वाणिज्य व कला शाखेची पुस्तके उपलब्ध असतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) देण्यात आली.

शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या पहिली ते अकरावीच्या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. आता बारावीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहे.

सुमारे 95 लाख पीडीएफ झाल्या डाऊनलोड
खाजगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता पाठ्यपुस्तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीच्या सर्व पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ फाईल्स मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या इतिहासात प्रथमच बाजारात पुस्तके उपलब्ध होण्याआधी त्याच्या पीडीएफ फाईल्स ऑनलाईन मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या. त्याला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत इयत्ता बारावीच्या 24 लाख व इयत्ता पहिली ते अकरावीच्या 70 लाख 92 हजार पीडीएफ फाईल्स डाऊनलोड केल्या गेल्या आहेत.

लॉकडाऊनच्या काळात देखील पाठपुस्तक मंडळाने पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. आता शारीरिक अंतर ठेवत, सुरक्षेच्या नियमांचे पालन करीत इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पुस्तके उपलब्ध करून देत आहोत. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्याकरीता पाठ्यपुस्तक मंडळाने यंत्रणा विकसित केली आहे. पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे.
विवेक गोसावी, संचालक, पाठ्यपुस्तक मंडळ

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.