पुणे – राज्यभरात इयत्ता बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. यात बोर्डाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे, असे आवाहन बोर्डाने केले आहे. तर, गैरप्रकार ठाळण्यासाठी 273 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांनाही परीक्षा काळात मोबाइल बंदी करण्यात आली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावाची परीक्षा उद्यापासून (दि.18) सुरू होत आहे. या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास बोर्डाने हेल्पलाइनची सुविधा उपलब्ध केली आहे. त्यासाठी विभागनिहाय हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन बोर्डाने केले आहे.
काही विषयांसाठी कॅल्क्युलेटरला परवानगी
बारावी परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना मोबाइल नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. मात्र, दिव्यांग विद्यार्थ्यांना गणित, पुस्तपालन व लेखाकर्म, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, विद्यार्थ्यांना मोबाइलमधील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही. परीक्षा केंद्रात पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांनाही परीक्षेच्या वेळेत मोबाइल वापरता येणार नाही. त्या कालावधीत मोबाइल शाळेत स्वतंत्र ठिकाणी जमा करणे अनिवार्य राहील, अशी माहिती डॉ. शंकुतला काळेंनी दिली.