पुणे – इयत्ता बारावी परीक्षेसाठी नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्यास 12 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली. कला, वाणिज्य, विज्ञान शाखांच्या नियमित विद्यार्थ्यांना 2 डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली होती. अर्ज भरताना कनिष्ठ महाविद्यालयांना तांत्रिक व इतर अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अर्ज भरण्यास मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला.
विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास 13 ते 20 डिसेंबर अशी मुदत आहे. कनिष्ठ महाविद्यालयांनी चलन डाऊनलोड करून बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी 12 ते 25 डिसेंबर अशी मुदत दिली आहे. कनिष्ठ महाविद्यालयांची विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्यासाठी 27 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले.