TVS Apache RTR 160 4V : टीव्हीएस मोटर कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपली अत्यंत लोकप्रिय आणि स्पोर्टी मोटरसायकल ‘अपाचे आरटीआर १६० ४व्ही’ (Apache RTR 160 4V) चे २०२६ मधील अपडेटेड व्हर्जन अधिकृतपणे लाँच केले आहे. या नवीन मॉडेलमध्ये कंपनीने अनेक महत्त्वाचे बदल केले असून, पूर्वी केवळ टॉप मॉडेलमध्ये मिळणारे फीचर्स आता बेस व्हेरियंटमध्येही उपलब्ध करून दिले आहेत. या नवीन बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १.२५ लाख रुपये इतकी असून, टॉप मॉडेलसाठी ती १.३७ लाख रुपयांपर्यंत जाते. विशेष म्हणजे, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने यात नवीन व्हेरियंट्सचा समावेश केला असून सुरक्षेच्या दृष्टीनेही अनेक सुधारणा केल्या आहेत. या अपडेटेड व्हर्जनमधील सर्वात मोठा बदल म्हणजे यात देण्यात आलेले क्लास-डी प्रोजेक्टर हेडलॅम्प आणि नवीन स्टाईलचे एलईडी डीआरएल्स (LED DRLs), ज्यामुळे रात्रीच्या वेळी बाईक चालवताना समोरचा रस्ता अधिक स्पष्ट दिसण्यास मदत होणार आहे. यासोबतच, आता सर्व व्हेरियंट्समध्ये ‘असिस्ट आणि स्लिपर क्लच’ हे फीचर स्टँडर्ड म्हणून देण्यात आले आहे, ज्यामुळे गिअर शिफ्टिंग अधिक सोपे आणि आरामदायी होईल. कंपनीने ही बाईक प्रामुख्याने तीन प्रकारात उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये सुरुवातीच्या सिंगल-चॅनल एबीएस व्हेरियंटमध्ये टेलिस्कोपिक फोर्क्स आणि डिजिटल एलसीडी क्लस्टर देण्यात आले आहेत. टीएफटी स्क्रीन आणि ट्रॅक्शन कंट्रोल – मध्यम श्रेणीतील ड्युअल-चॅनल एबीएस व्हेरियंटची किंमत १.३१ लाख रुपये ठेवण्यात आली असून, यात ॲडजस्टेबल लीव्हर्सची सुविधा मिळते. हा व्हेरियंट मॅट ब्लॅक, ग्रॅनाइट ग्रे आणि पर्ल व्हाईट अशा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर या मालिकेतील सर्वात प्रीमियम मानल्या जाणाऱ्या टॉप-एंड यूएसडी व्हेरियंटची किंमत १.३७ लाख रुपये आहे. या मॉडेलमध्ये ५ इंचाची टीएफटी स्क्रीन आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखे प्रगत फीचर्स मिळतात, जे रायडरला सुरक्षित आणि आधुनिक अनुभव देतात. हा प्रीमियम व्हर्जन मॅट ब्लॅक, रेसिंग रेड आणि मरीन ब्लू या रंगात खरेदी करता येईल. हेही वाचा – Toll Tax: टोल नाक्यावर आता रोख रक्कम चालणार नाही; 1 एप्रिलपासून NHAIचा नवा नियम लागू इंजिन आणि मेकॅनिक्सच्या बाबतीत बोलायचे झाले तर, टीव्हीएसने यात पूर्वीप्रमाणेच १५९.७ सीसीचे सिंगल-सिलेंडर इंजिन कायम ठेवले आहे. या बाईकमध्ये रायडिंगचे दोन मोड्स देण्यात आले असून, मोडनुसार बाईकची शक्ती बदलत राहते. स्पोर्ट मोडमध्ये हे इंजिन १७.६ एचपी पॉवर आणि १४.७३ एनएम टॉर्क जनरेट करते, तर अर्बन आणि रेन मोडमध्ये ही पॉवर थोडी कमी होऊन १५.६ एचपी आणि १४.१ एनएम टॉर्क इतकी मिळते. हाय-टेक फीचर्स आता कमी किमतीत उपलब्ध करून दिल्याने ही बाईक तरुणांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास कंपनीला आहे.