पुणे – शिक्षक भरतीच्या पवित्र पोर्टलवर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असून त्या सोडविण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यामुळे एक दिवस पोर्टल तात्पुरते बंद ठेवण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी संस्थामध्ये पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन सर्व्हरही पोर्टलवर अपलोड करण्यात आले. मात्र या सर्व्हरला सतत अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. पोर्टलवरील विविध अडचणी दूर करण्यासाठी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिक्षण विभाग व एनआयसीच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्याचा धडाका लावला आहे. रविवारी सकाळी 10 ते सोमवारी सकाळी 11 वा. या वेळेत पोर्टल बंद राहणार आहे, अशी सूचना पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
अडचणी दूर झाल्यानंतरच उमेदवारांना नव्याने शाळांचा प्राधान्यक्रम जनरेट करुन लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एकूण सर्व रिक्त पदाच्या जाहिराती व मुलाखतीशिवाय उमेदवारांची निवड होणाऱ्या शैक्षणिक संस्थांची यादी पोर्टलवरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. अर्ज स्वप्रमाणित करण्यासाठी उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. ईडब्लूएस प्रवर्गासाठी नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र मात्र सादर करावे लागणार आहे.
शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता अद्ययावत करण्याची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. आझम कॅम्पसमध्ये उमेदवारांना संगणक कक्षाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. मात्र, या ठिकाणी उमेदवारांची खूप गर्दी होऊ लागल्याने गोंधळ उडू लागला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.