चाकणसाठी सोडलेले पाणी केले बंद

‘भामा आसखेड’मध्ये केवळ 8.45 टक्‍के साठा

शिंदे वासुली – भामा आसखेड धरणात केवळ 8.45 टक्‍के पाणीसाठा शिल्लक असताना ही चाकण शहराला पिण्यासाठी धरणातून शुक्रवारी (दि. 21) 500 क्‍युसेकने भामानदी पात्रात पाणी सोडण्यात आलेले पाणी शनिवारी (दि. 22) सायंकाळी बंद करण्यात आले आहे. मात्र, हे पाणी सोडल्यामुळे धरणाखालील 19 गावे आणि एमआयडीसीसाठी वरदान ठरलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा योजना धोक्‍यात आल्याचे चिंतेने नागरीकांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

चाकण (ता. खेड) शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या रोहकल व वाकी खुर्द या दोन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने चाकणकरांची तहान भागविण्यासाठी भामा आसखेड धरणाच्या आयसीपीओतून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे चाकण शहराची तहान भागणार असून शहरामध्ये निर्माण झालेली पाणीटंचाईची समस्या आता टळली आहे. धरणामध्ये रेकॉर्ड ब्रेक अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे. खेड तालुक्‍यातील धरणाच्या खालील भामा नदीवरील सगळेच बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. शेतकऱ्यांची शेतातील पिके पाण्या अभावी करपून चालली आहेत. नदीलगतच्या शेतकऱ्यांनी खेडच्या प्रांताधिकाऱ्यांकडे धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. परंतु प्राधान्याने असणारे पाणी तालुक्‍यातील दुष्काळी भागात टॅंकरच्या माध्यमातून पुरवणे प्रशासनाची जबाबदारी असून यापुढे धरणातून पाणी सोडता येणार नसल्याचे सांगितले होते. आणि आता मात्र चाकण शहरासाठी पाणी सोडल्याने काही शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या अल्प पाणीसाठ्यामुळे या एमजीपी योजनेच्या जॅकवेलचे रोजपीस उघडे पडत असून चर काढून पाणी जॅकवेलकडे वळवावे लागत आहे. सध्या धरणात राहिलेला अल्प पाणीसाठा लक्षात घेता आणि मान्सूनचे लांबणारे आगमन पाहता उपलब्ध पाणीसाठा कमी पडेल अशी शक्‍यता निर्माण झाली आहे. एमआयडीसी भागात अधिकृत नोंदीपेक्षा कितीतरी जास्त लोकसंख्या या पाण्यावर अवलंबून आहे. आताच या भागातील नागरिकांना पाणी कमी प्रमाणात मिळत आहे. भविष्यात धरणात पाणी राहिले नाही तर या योजनेला पाणी कमी पडू शकते. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागेल, अशी
परिस्थिती आहे.

पाणीपुरवठा योजनेला धोका नाही
भामा आसखेड पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता भरत बेंद्रे यांनी वरिष्ठ अधिकारी कार्यकारी अभियंता यांचे सुचनेनुसार धरणातून पाणी सोडले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेला कोणत्याही प्रकारचा धोका होणार नसल्याचे सांगितले. धरणातील पाणीसाठा एमजीपीच्या जॅकवेलपासून सुमारे 10 मीटर उंचीवर आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या योजनेला पाणी कमी पडणार नाही. तसेच चाकण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही बंधारेच भरतील याची खबरदारी घेण्यात आली होती. कारण नदीवरील अन्य बंधाऱ्याचे ढापे काढून घेऊन पाणी थेट रोहकल व वाकी बंधाऱ्यात सोडले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)