करोना काळात उपयोगी हळद

करोना काळात हळदीतील कर्क्‍युमिन फारच उपयोगी

ओळख वनस्पतींची : डॉ. आरती सोमण

रोगप्रतिकारकशक्‍ती चांगली राखण्यात व शरीराची झीज भरून काढण्यासाठी हळदी मधील कर्क्‍युमिन उपयोगी पडते. हे कर्क्‍युमीन ऍन्टीसेप्टीक, ऍन्टीइनफ्लेमेटरी दाहशमक, तसेच जैवप्रतिरोधक म्हणून काम करते. कफाचा विकारांत रूक्ष व लघु गुणांमुळे हळद उपयोगी पडू शकते. सायनस व श्‍वसन संस्थेच्या विकारात हळदीचा खुप उपयोग होतो.

छातीत साठलेला कफ मोकळा करण्यासाठी हळद व सूंठ यांचे मिश्रण मधातून चाटण म्हणून दिल्यास चांगला फरक पडतो. तसेच कोणत्याही व्हायरल संसर्गानंतर होणाऱ्या रक्‍तातील गुठळ्या कमी करण्यासाठी हळदीमधील कर्क्‍युमीन चांगले काम करू शकते. इन्फेक्‍शननंतर येणारा थकवा व तणाव यासाठी हळद उपयोगी पडते. हळदीमधील ऍन्टीऑक्‍सीडंट घटक ताण कमी करण्यात व मेंदूची ताकद वाढविण्यात उपयोगी पडते. जीर्ण सर्दी व पडसे यांत हळद व पिंपळी श्‍वसनमार्ग मोकळा करून श्‍वसन संस्थेला बळ देते. वारंवार होणारे सर्दी व पडसे कमी करते.

हळद किंवा हरिद्रा या वनस्पतीला भारतीय जेवणाबरोबरच अनेक भारतीय रूढी व परंपरा यांत खुप मोठे स्थान आहे. जेवणाला स्वाद व रंग आणण्यापासून जेवणाची औषधि गुणवत्ता वाढवण्यात हळदीच्या मोठा वाटा आहे. त्वचेचे सौंदर्य व कांती वाढविण्यापासून अनेक प्रकारच्या जीर्ण व्याधीमध्ये हळद उत्कृष्ट प्रकारे काम करते.

हरिद्रा नावाचा अर्थक त्वचेची कांती वाढविणारा व त्वचेला सोन्यासारखी लकाकी देणारा म्हणुन हळदीला कांचनी असे संबोधले जाते. हळद, त्वचेची निगा राखण्यात उत्तम प्रकारे काम करते. त्वचा विकारात हळद एक नैसर्गिक दाहशामक व व्रणरोपक म्हणुन वापरली जाते. व्रणाचे शोधन करून जखम भरून काढण्यात हळद खुप चांगल्याप्रकारे काम करते. जखमेत कोणताही संसर्ग होऊ देत नाही.

त्यामुळे ऍन्टीसेप्टीक म्हणून हळदीचा उपयोग केला जातो. त्वचा विकारात त्वचेवरील डाग, पुरळ, डोळयाखाली काळे होणे, त्वचेवरील मुरूमे यावर हळद अत्यंत उपयोगी आहे. हळदीमधील दाहशमन करणारे घटक तसेच ऍन्टीऑक्‍सीडंटस्‌ हे कांती चांगली करतात. मुरमे व सुरकुत्याचसाठी हळद व मध एकत्र करून लावल्यास मुरमाचे डागसुध्दा नष्ट होतात व पुरळ लगेच कमी होतात.

त्वचेवरील सुरकुत्या व उन्हामुळे येणारा काळसरपणा यांत हळद अत्यंत चांगल्याप्रकारे काम करते. त्वचेमधील काही घटक जे सुरकुत्या पडण्यास कारणीभुत असतात त्यांना अटकाव करण्यात तसेच त्वचा तजेलदार व टवटवीत ठेवण्यास मदत करते. हळद, कोरफड, तीळतेल यांचे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.

तसेच स्ट्रेचमार्क, कोरडी त्वचा, यासारख्या आजारांमध्ये हळद पोटातून व बाहेरून उपयोगी पडते. त्वचेचा दाह कमी करणे, त्वचा नितळ व सुकुमार बनवणे यांत हळद काम करते.
हळद कृमिघ्न म्हणून पण वापरली जाते. पोटातील जंतावर हळद व वावडींग चांगल्या प्रकारे काम करतात. जंत व कोणताही जंतु संसर्ग झाल्यास हळद पोटातून दिली जाते. मधुमेही रूग्णांमध्ये हळद रक्‍तातील साखरेचे प्रमाण योग्य राखण्यासाठी उपयोगी पडते. मधुमेही रूग्णांमधील जखमा लवकर भरून येण्यास मदत करते.

तसेच जंतुसंसर्ग कमी करते. रक्‍ताभिसरण चांगले होण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. रक्‍तातील गाठी होण्याचे प्रमाण कमी करते व रक्‍त पातळ होण्यास मदत करते. पक्षाघात किंवा हृदयविकार यासारख्या आजारात रक्‍तातील गाठी होण्यापासून रोखण्यात हळद उपयोगी आहे. रक्‍तशुध्दीकरण करणे हे हळदीच्या प्रमुख कार्य आहे.

अपचन पोट साफ न होणे, ऍसिडीटी, मळमळ पोटाचे विकार यांमध्ये हळद दाह व दुखणे कमी करते. पोटाचे पचनाचे काम चांगले करते. पाचक स्त्राव चांगल्या प्रकारे निर्माण होण्याचे काम करते.

यकृतावर हळद उत्तम काम करते. यकृत विकारात दाह कमी करणे पचन चांगले करणे व यकृतातील पाचक स्त्राव निर्माण करण्यास उपयोगी पडते. कडु व तिखट रसामुळे तसेच उष्ण वीर्य व रूक्ष गुणामुळे यकृतावर चांगले काम करते व रक्‍त चांगल्या प्रकारे निर्माण होण्यास मदत करते. रक्‍ताचे प्रमाण व दर्जा चांगला बनविण्यासाठी मदत करते.

प्रसुतीनंतर गर्भाशयाची शुध्दी करण्यासाठी व संसर्ग टाळण्यासाठी हळद दिली जाते. गर्भाशयावरची सुज कमी करते व दुखणे पण कमी करून कोणतेही व्रण राहु देत नाही. तसेच स्तन्य म्हणुन पण दुध उर्त्सजन होण्यास हळद उपयोगी पडते. शरीरातील झीज भरून काढुन दुखणे कमी करण्यास हळद चांगली उपयोगी पडते. सुतीका अवस्थेत हळद ज्वर कमी करण्यास तसेच पचनसंस्थेच्या विकारात उपयोगी पडते.

कॅन्सरच्या इलाजासाठी हळदीवर खुप संशोधन करण्यात आले आहे. हळदीमधील काही घटक हे कॅन्सर पेशींना अटकाव घालण्यासाठी उपयोगी पडतात तसेच कॅन्सर पेशींना नष्ट करण्यासाठी हळदीचा उपयोग होतो. रोजच्या जेवणात हळद सेवन केल्यास निरोगी व उत्साही राहणे सहज शक्‍य आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.