पुणे विद्यापीठात नॅनोटेक्‍नोलॉजीद्वारे हळदीवर संशोधन

प्रदूषणामुळे उद्‌भवणाऱ्या आरोग्य समस्यांवर गुणकारी रसाची निर्मिती

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असलेले आणि त्यानंतर केंब्रिज विद्यापीठातून नॅनो-बायोटेक्‍नॉलॉजीचे शिक्षण घेतलेले डॉ. विजय कनुरू यांनी नॅनोटेक्‍नोलॉजीचा वापर करून हळदीवर संशोधन केले आहे. पाण्यात न विरघळणाऱ्या हळदीला डॉ. कनुरू यांनी आपल्या संशोधनाद्वारे हळद रसाचे स्वरूप दिले आहे. हा रस पाण्यात विरघळण्याजोगा असून त्यातून “कर्क्‍युमिन’ हे औषधी द्रव्य पुरेशा प्रमाणात मिळते. त्यामुळे दररोज सकाळी केवळ 1 ते 2 चमचे हळद रसाचे सेवन केल्यास दैनंदिन प्रदूषणामुळे आरोग्यावर होणारे अनेक विपरित परिणाम टाळणे सहज शक्‍य असल्याचे डॉ. कनुरू यांनी सांगितले.

या हळद रसाला त्यांनी “हरस टर्मेरिक ज्यूस’ असे नाव दिले असून, “डेली डीटॉक्‍स’चे फायदे मिळवण्यासाठी त्याचे सेवन उपयुक्‍त ठरते, असे डॉ. कनुरू यांनी सांगितले. शहरातील वाहनांची गर्दी, उद्योगांमुळे होणारे प्रदूषण आणि मोठ्या प्रमाणावर होणारी बांधकामे यामुळे हवेत प्रदूषणाचे प्रमाण मोठे असते. प्रवास वा कामाच्या निमित्ताने बराच वेळ प्रदूषित हवेत राहावे लागल्यानंतर शारीरिक आणि मानसिक थकवा आणि तणाव जाणवतो. पीएम 2.5 अर्थात अतिसूक्ष्म प्रदूषक कण फुफ्फुसांवाटे रक्‍तात मिसळत असल्यामुळे ते अधिक त्रासदायक ठरतात. अशा प्रदूषणाच्या त्रासामुळे शरीरात ठिकठिकाणी सूज येऊ शकते, तसेच हृदयाच्या रक्‍तवाहिन्या, यकृत आणि इतर महत्त्वाच्या अवयवांवर त्याचे दुष्परिणाम होतात. पुण्यात या प्रकारच्या प्रदूषणाचे प्रमाण मोठे असून नॅनोटेक्‍नोलॉजीद्वारे तयार केलेला हळदीचा रस प्रदूषणाच्या दुष्परिणामांसाठी प्रतिबंधक ठरू शकतो. या रसामुळे शरीराची अंतर्गत स्वच्छता साधली जाते, तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवणे आणि त्वचा निरोगी होण्यासाठीही याची मोठी मदत होते, असे डॉ. कनुरू यांनी सांगितले.

“हरस टर्मेरिक’ ज्यूसच्या निर्मितीत नॅनोटेक्‍नोलॉजीचा वापर
आपल्या रोजच्या जेवणात हळदीचा समावेश असला तरी त्यातून आपल्याला मिळणाऱ्या “कर्क्‍युमिन’ या औषधी द्रव्याची मात्रा फारच कमी असते. शिवाय, जे औषधी गुण त्यातून मिळतात ते शरीरात पूर्णतः शोषले जात नाहीत, असेही डॉ. कनुरू यांनी सांगितले. “हरस टर्मेरिक’ ज्यूसच्या निर्मितीत नॅनोटेक्‍नोलॉजीचा वापर झाल्यामुळे त्यात “कर्क्‍युमिन’ द्रव्याचे प्रमाण चांगले राखता आले, शिवाय ते पेशींमध्ये अधिक चांगल्या प्रकारे शोषले जाते, अशी माहिती डॉ. कनुरू यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.