अंकारा – जगाच्या पाठीवरील सर्वच देशांमध्ये सीमेवरील संघर्ष आढळतो. अनेक देशांच्या सीमा एकमेकाला लागून आहेत. त्यांच्यामध्ये नेहमी सीमावाद असतो; पण आता तुर्कस्तानातील भूकंपानंतर सीमावादाच्या आणि सीमेवरील संघर्षाच्या या भिंतीही गळून पडल्या असून तुर्कस्तान आणि आर्मेनिया या दोन देशांमधील सीमा तब्बल तीस वर्षानंतर खुल्या करण्यात आल्या आहेत.
आर्मेनियातील नागरिक आणि तुर्कस्तानमधील अझरबैझानी नागरिक यांच्यातील संघर्षानंतर 1993 मध्येच तुर्कस्थान आणि आर्मेनिया यांच्यातील सीमा बंद करण्यात आली होती पण या आठवड्यात आर्मेनियाने आपल्या सीमा खुल्या केल्या आणि तुर्कस्तानच्या मदतीसाठी शेकडो ट्रक या सीमेतून तुर्कस्तानमध्ये दाखल झाले.
या भूकंपाच्या निमित्ताने सर्वच देशांनी आपला वैरभाव विसरला असून तुर्कस्तानशी कशाही प्रकारे संबंध असले तरी अनेक देश तुर्कस्तानच्या मदतीला धावले आहेत. आर्मेनियाने सुद्धा मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्या सीमा खुल्या केल्या करून तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे तुर्कस्थान आणि आर्मेनिया यांच्यामध्ये टोकाचा राजकीय संघर्ष आहे. त्याची बीजे पहिल्या महायुद्धाच्या काळातच रोवली गेली होती.
पहिल्या महायुद्ध काळात तुर्कस्तानच्या ऑटोमन साम्राज्याने आर्मेनियातील नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केल्याने आजही आर्मेनियातील नागरिक तुर्कस्थानला आपला शत्रूच मानतात. याच भावनेने 1993 नंतर दोन्ही देशातील सीमा बंद करण्यात आल्या होत्या, पण तुर्कीवर नैसर्गिक आपत्ती ओढवल्यानंतर आर्मेनियाने संपूर्ण वैरभाव बाजूला ठेवला असून आपल्या सीमा खुल्या करून तब्बल 100 टन खाद्यान आणि पाणी तुर्कस्तान मध्ये रवाना केले.