तूरडाळ रडवणार; किरकोळ बाजारात शंभरीपार

पुणे – खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असताना त्यापाठोपाठ तूरडाळीचे दर कडाडले आहेत. किरकोळ बाजारात तूरडाळीने शंभरीपार केली असून सर्वच डाळींच्या दरातील वाढीमुळे सामान्यांना झळ पोहोचली आहे. करोनामुळे राज्यात निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून किराणा माल खरेदीसाठी किरकोळ बाजारात गर्दी झाली आहे. खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. तूरडाळ तेजीत आहे. किरकोळ बाजारात अनेक किराणा माल विक्रेते तुटवडा असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे निर्बंधात खरेदी करणाऱ्या ग्राहकांना दरवाढीची थेट झळ पोहोचली आहे.

आणखी दरवाढीचा बोजा
गेल्यावर्षी ऑक्‍टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका तुरीच्या वाढीला बसला. तूर, मूग, उडीद काढणीच्या वेळी भिजले तसेच रब्बी हंगामातील हरभरा काढणीस उशीर झाला. त्यामुळे उत्पादन घटले. त्यामुळे किरकोळ बाजारात एक किलो तूरडाळीच्या दरात गेल्या काही महिन्यात दहा ते पंधरा रुपयांनी वाढ झाली. मूग, उडीद, हरभरा, मसूर या डाळींच्या दरात काहीशी वाढ झाली. तूरडाळीच्या उत्पादनात घट झाल्याने दरात वाढ होत असल्याची माहिती लातूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, पुढील दोन महिन्यांत डाळीच्या दरात किलोमागे दहा रुपयांनी वाढ होण्याची शक्‍यता व्यापाऱ्यांनी व्यक्‍त केली.

आयातीवरील निर्बंध उठवल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम
दोन वर्षांपूर्वी तूरडाळीचा तुटवडा जाणवत होता. तेव्हा दरात मोठी वाढ झाली होती. दीडपट, दुप्पट दराने किरकोळ बाजारात तूरडाळीची विक्री होत होती. तूरडाळीतील वाढीमुळे गृहिणींचे स्वयंपाकघरातील अंदाजपत्रक कोलमडून पडले होते. डाळीचे दर वाढले असले, तरी आयातीवरील निर्बंध उठवले तर पुन्हा स्थानिक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागेल.

तूरडाळीच्या दरातील तेजी कायम असून मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तूरडाळीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. राजस्थानात झालेल्या अवकाळी पावसामुळे चणाडाळीच्या दरात किलोमागे पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. तूरडाळीने शंभरी पार केली आहे. महाराष्ट्रात मराठवाडा विभागात डाळींचे मोठे उत्पादन घेतले जाते. तेथे झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. लहरी हवामानाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना बसला आहे.
– संतोष दुगड, डाळ व्यापारी, मार्केट यार्ड, गूळ-भुसार बाजार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.