Reservation | भारताचा शेजारील देश बांगलादेशात सत्तापालट झाली आहे. हिंसक निदर्शनादरम्यान बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना अचानक पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला. यानंतर देशाचे लष्करप्रमुख वकार-उझ-जमान यांनी लष्कराच्या मदतीने नवीन अंतरिम सरकार स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
शेजारील बांगलादेशात आरक्षणाविरोधात पसरलेल्या हिंसाचाराची चर्चा जगभरात होत आहे. भारतातही आरक्षणावर अनेक निदर्शने झाली, पण इतकी वाईट परिस्थिती कधीच घडली नाही. भारतात देखील आरक्षणाची मागणी आणि आरक्षणाविरोधात आंदोलने होण्याचा मोठा इतिहास आहे.
1990 मध्ये तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंह यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी पहिल्यांदा लागू केल्या, तेव्हा देशातील सवर्ण समाजाचे लोक रस्त्यावर आले होते. ओबीसी आरक्षणाविरोधात देशभरात आंदोलने झाली. याच दरम्यान दिल्ली विद्यापीठाचा विद्यार्थी राजीव गोस्वामी याने आत्महत्या केली. हे निदर्शन ओबीसी प्रवर्गासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये २७ टक्के आरक्षणाविरोधात होते.
दिल्ली विद्यापीठात निदर्शने सुरू झाली असली तरी ती देशभरातील अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये पसरली, ज्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये हिंसक निदर्शने झाली. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांनी परीक्षांवर बहिष्कार टाकला. भाजपने जनता दल सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याने हे आंदोलन संपले आणि व्हीपी सिंह यांनी ७ नोव्हेंबर १९९० रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
पटेल आंदोलन – 2015 मध्ये गुजरातमध्ये हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी निदर्शने झाली होती. 12 हून अधिक शहरांमध्ये पटेल समाजाचे लोक रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी तोडफोड आणि जाळपोळ केली. शेकडो वाहने जाळण्यात आली होती.
गुजर आंदोलन- स्वतंत्र आरक्षणाच्या मागणीसाठी राजस्थानमधील गुर्जर समाज अनेकवेळा रस्त्यावर उतरला आहे. त्यांनी अनेक दिवसांपासून रेल्वे मार्ग रोखून धरला आहे. 2015 मध्ये गुर्जर समाजाच्या लोकांनी रस्त्यावर उतरून रेल्वे ट्रॅकवर कब्जा केला होता. 21 मे 2015 रोजी गुर्जर रस्त्यावर उतरले तेव्हा अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. चळवळीचे मुख्य केंद्र भरतपूर जिल्ह्यातील बयाना तहसीलचे पुरा गाव होते. त्यानंतर सत्ताधारी भाजप सरकारने पुन्हा एकदा पाच टक्के आरक्षणाची युक्ती आजमावली. पण नंतर आरक्षण ५० टक्क्यांच्या मर्यादेच्या पुढे गेले आणि हायकोर्टाने त्याला स्थगिती दिली.
जाट आंदोलन – यूपीए सरकारने जाट समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश केला होता, तो न्यायालयाने रद्द केला होता. त्यामुळे हरियाणासह अनेक राज्यांमध्ये जाट समाजाचे लोक रस्त्यावर उतरले. त्यांच्या आंदोलनाने हिंसक पवित्रा घेतला होता. आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम हरियाणामध्ये दिसून आला.
आंध्र प्रदेश – आंध्र प्रदेशातील कापू समुदायाने 2016 मध्ये ओबीसी दर्जाच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने केली होती. राज्यातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात निदर्शनादरम्यान आंदोलकांनी रत्नाचल एक्स्प्रेसच्या चार डब्यांसह दोन पोलीस ठाण्यांना आग लावली होती. यावेळी अनेक लोक आणि पोलीस जखमी झाले होते.
मराठा आरक्षण- महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. मराठा समाजाचे लोक अनेकदा रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आरक्षणाच्या मूद्यावरून महाराष्ट्रातील अनेक तरुणांनी आत्महत्या सारख्या टोकाचे पाऊल उचलले आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी उपोषण केले. ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, मात्र दुसरीकडे ओबीसी समाजाकडून मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला मोठा विरोध होत आहे.
हेही वाचा :