विदेश वृत्त : ट्युनिशियात अध्यक्षांनी पंतप्रधानांना हटवले

देशव्यापी आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर संसदही स्थगित

ट्युनिस, (ट्युनिशिया) – ट्युनिशियामध्ये देशभर सुरू असलेल्या प्रचंड आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर अध्यक्ष काईस साईद यांनी पंतप्रधान हिचेम मेचिची यांना पदावरून हटवले आहे. अध्यक्षानी संसद देखील स्थगित केली आहे. आज संसदेला सुरक्षा दलांनी वेढा घातला आणि संसदेच्या सभापतींनाही संसदेमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून देशाच्या बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीवरून ट्युनिशियामध्ये देशव्यापी आंदोलन सुरू आहे.

अध्यक्षांनी पंतप्रधानांना हटवून संसद स्थगित केल्याचे नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात येऊ लागले आहे. मात्र अध्यक्षांचा हा निर्णय म्हणजे सत्ता बळकावण्याचा प्रकार असल्याची टीका राजकीय विश्‍लेषकांकडून करण्यात येते आहे. अध्यक्षांच्या निर्णयानंतर पोलिसांनी अल जझीरा या वाहिनीवर छापा घातला आणि वाहिनीचे काम थांबवले.

करोनाच्या साथीमुळे ट्युनिशियाचे अर्थकारण आगोदरच डबघाईला आले होते. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरुन आंदोलन करायला सुरुवात केली होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून चौथ्यांदा कर्ज घ्यावे लागल्याने सरकारने अनुदानही बंद केले होते. याशिवाय करोनाच्या निर्बंधांचा निषेध करण्यासाठी राजधानी ट्युनिससह देशातील अनेक शहरांमध्ये विराट मोर्चे काढले गेले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.