तुलसी गबार्ड यांनी गुगलला पाठवली 5 कोटी डॉलर्सची नोटीस

वॉशिंग्टन – 2020 च्या निवडणूक प्रचारादरम्यान अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणून तसेच सहा तासांसाठी त्यांचे प्रचाराचे अकाउंट बंद केल्यामुळे त्यांच्या सोशल मीडियावर प्रचारावर परिणाम झाला असा आरोप करत अमेरिकेच्या डेमॉक्रॅटिक पक्षाच्या नेत्या तुलसी गबार्ड यांनी गुगलला 5 कोटी डॉलर्सची नोटीस बजावली आहे.

38 वर्षाच्या तुलसी गबार्ड या डोनाल्ड ट्रम्प विरोधात 2020ची राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत आहेत. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या प्रचार करत आहेत. 27 आणि 28 जूनदरम्यान सहा तासांसाठी त्यांचे प्रचाराचे अकाऊंट बंद करण्यात आले होते. यामुळे जाहिराती मिळवण्यास आणि मतदात्यांपर्यंत पोहोचण्यास गबार्ड यांना अडचण आली होती. अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक लढवणाऱ्या गबार्ड या पहिल्या हिंदू उमेदवार आहेत.

गुगलने माझ्यासोबत भेदभाव केला असून माझ्या प्रचारावर गुगलच्या निर्बंधांचा परिणाम झाला आहे. असे मत गबार्ड यांनी व्यक्त केले आहे. यामुळे गुगल निवडणुका आणि प्रचार यंत्रणांवर प्रभाव पाडू शकते आणि हे अत्यंत धोकादायक आहे असेही त्यांनी सांगितले. गुगल जर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असेल तर हा निश्‍चित आमच्या लोकशाहीला धोका आहे. अमेरिकन नागरिकांच्या हक्कांसाठी गुगलविरोधात लढेन, असेही गबार्ड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)