तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी व आराध्य दैवत असलेल्या श्री तुळजा भवानी मातेच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारणाऱ्या तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यास अखेर रविवारी पोलीसांनी अटक केली आहे. तुळजापूरयेथील न्यालयासमोर आरोपीला उभे केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडीची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.
सदरील गुन्हा नोंद झाल्यापासुन नाईकवाडी तब्बल 1 वर्षे फरार होता. माञ अखेर त्याच्या मुसक्या पोलीसांनी आवळून अटक केली. नाईकवाडीने 35 तोळे सोने, 71 किलो चांदी व 71 प्राचीन नाणी गायब केल्याप्रकरणी गेल्या वर्षी 13 सप्टेंबर 2020 रोजी गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
नाईकवाडी यांच्या 17 वर्षाच्या कालावधीत त्याने टप्पाटप्प्याने पुरातन नाणी गायब केली आहेत. त्यामुळे या काळात त्यास कोण मदत केली? त्याचे साथीदार व सुञधार कोण? ही नाणी सध्या कुठे आहेत यासह अन्य बाबी तपासात समोर येणार आहेत.
याबाबत श्री तुळजा भवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी त्यांचे वकील शिरीष कुलकर्णी यांच्यामार्फत तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्याकडे दि.9 मे 2019 रोजी लेखी तक्रार केली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी तत्काळ याचे गांभीर्य ओळखुन चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये अनेक धक्कादायक प्रकार समोर आले होते.