तुकोबांचे मुख्य मंदिर आणखी तीन दिवस बंद राहण्याची शक्‍यता

  • पंढरपूर कार्तिकी एकादशी : भाविकांची संभाव्य गर्दी टाळण्यासाठी मंदिर प्रशासन पाऊल उचलणार

देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथील मुख्य मंदिरात गुरुवारी (दि. 26) पंढरपूर कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांची संभाव्य गर्दी होण्याची शक्‍यता असल्याने येत्या बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार असे सलग तीन दिवस (25 ते 27 नोव्हेंबर) मुख्य मंदिर बंद ठेवणार असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कोविड 19 संसर्गामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली मंदिरे पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू झाले असले तरी कार्तिकी यात्रेवर पुन्हा निर्बंध येण्याचे सावट आहे. देशभरात कोविड 19 संसर्ग अजूनही आटोक्‍यात आला नाही. अशातच दुसरी लाट येण्याची भीती आरोग्य संस्थानी व्यक्‍त केली आहे. गुरूवारी (दि. 26) पंढरपूर कार्तिकी एकादशी असून, त्यानंतर 11 डिसेंबर रोजी कार्तिकी एकादशी म्हणजे तीर्थक्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन सोहळा आहे. आळंदी येथील ही यात्रा मोठ्या स्वरूपात होत असते.

संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन सोहळ्यास राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्‍त, वैष्णव बांधव होत असलेल्या आळंदी येथील कार्तिकी एकादशीनिमित्त देहूत दर्शनासाठी येत असतात. तीर्थक्षेत्र देहूतील श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शनानंतर तीर्थक्षेत्र आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्‍वर महाराजांचे दर्शन व संजीवन सोहळा पाहण्यासाठी भाविक वारकरी गर्दी करतात. आषाढी वारीतील पालखी सोहळा यंदा रद्द होऊन मोजक्‍याच भाविकांमध्ये श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका एसटी बसने पंढरपूरला नेण्यात आल्या होत्या.

येत्या गुरुवारी होणाऱ्या कार्तिकी एकादशीनिमित्त कोकण, कर्नाटक भागातून भाविक मोठ्या संख्येने पंढरपूरात येत असतात. येथील कार्तिकीला भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्‍यता आहे. यात्रेला गर्दी होऊन कोविड 19 संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळेच सोलापूर जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून आषाढी एकादशीप्रमाणेच कार्तिकी यात्रा सुध्दा प्रतिकात्मक रूपात साजरी करावी. तसेच आषाढी यात्रा पद्धतीने नियम असावेत, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने शासनाला दिला आहे. त्यामुळे आता आषाढी वारी पध्दतीने कार्तिकी यात्रा रद्द होण्यावर सावट आहे.

भाविकांची सुरक्षितता महत्त्वाची
याबाबत श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्‍वस्त संजय महाराज मोरे आणि विशाल महाराज मोरे यांच्याशी संपर्क साधला असता संस्थानचे अध्यक्ष व विश्‍वस्त यांची बैठक घेऊन माझे गाव, राज्य, देश, माझी जबाबदारीला अनुसरून शासनाच्या कोणतेही परिपत्रक, आदेशाची वाट न पाहता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी करोना महामारी संकटाचा विचार करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.