मुंबई – कोणत्याही दबावास बळी न पडता नियमानुसार काम करणारे शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांची काही दिवसांपूर्वी नागपूर महापालिका आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली होती. राज्याची उपराजधानी नागपूर येथून मूढेंना राजधानी मुंबईमध्ये हलवण्यात आले होते. येथे त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये जबाबदारी देण्यात येत असल्याचंही जाहीर करण्यात आलं होत. मात्र कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
याबाबतचे आदेश राज्य सरकारतर्फे काढण्यात आले असून त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमध्ये रुजू होऊ नका, असा संदेश देण्यात आलाय.
राज्य सरकारने याबाबतचे आदेश दिले असून मुंबई जीवन प्राधिकरणचा अतिरिक्त कार्यभार मदत व पुनर्वसनचे सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे देण्यात आला आहे. एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ नागपूर तसेच ई रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
दरम्यान कडक शिस्तीचे अधिकारी अशी ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांना कोणती जबाबदारी देणार याबाबतचा कोणताही निर्णय अद्याप जाहीर करण्यात आला नाही.
तत्पूर्वी, तुकाराम मुंढे यांची नागपूर येथील कारकीर्द देखील चांगलीच वादळी ठरली होती. नागपुरातही लोकप्रतिनिधींकडून मुंढे यांच्यावर ते लोकनियुक्त प्रतिनिधींना किंमत देत नाहीत, हुकूमशहा प्रमाणे निर्णय घेतात असे आरोप करण्यात आले होते. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यासोबत त्यांचे विशेष खटके उडाल्याचे पाहायला मिळालं होत.
दरम्यान, राज्य सरकारतर्फे आता मुंढे यांची पदभार स्वीकारण्यापूर्वीच बदली करण्यात आल्याने त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्यात येणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.