नागपूर- नागपुरातील कोरोनाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाची स्थिती पाहता, त्यांची बदली रद्द करुन, पुन्हा नागपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्त करा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेनेचे नागपूर उपजिल्हाप्रमुख आणि नगरसेवक किशोर कुमेरिया यांनी याबाबतचं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे. तुकाराम मुंढे यांच्या अनेक उपाययोजनांमुळे नागपुरातील स्थिती चांगली होती मात्र आता वाढते रुग्ण आणि प्रशासनाची किंवी आरोग्य विभागाची कामगिरी पाहता ही मागणी करण्यात आली आहे.
“नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अथक प्रयत्न करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत नाही. आरोग्य यंत्रणा पुरती कोलमडली आहे. तुकाराम मुंढे महापालिका आयुक्त असताना नागपुरात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. त्यामुळे त्यांची पुन्हा नागपुरात आयुक्त म्हणून बदली करा”, असं किशोर कुमेरिया यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, 26 ऑगस्ट रोजी तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश निघाले होते. त्यांची बदली महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे सचिवपदी झाली. मात्र अवघ्या 15 दिवसात त्यांची बदली रद्द झाली. त्यामुळे त्यांच्या नव्या नियुक्तीची उत्सुकता सर्वांना आहे.