संत तुकोबांच्या दर्शनानंतर भाविक माउली चरणी

देहूत कार्तिकी एकादशी : वारकऱ्यांनी ठेवले प्रस्थान

देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथे कार्तिकी एकादशीनिमित्त शनिवारी भाविकांची गर्दी वाढली होती. मुख्य मंदिरामध्ये भाविकांना रांगेने दर्शन घेता यावे यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने दर्शनबारी तसेच मंडप उभारण्यात आले आहे. शनिवारी एकादशी दिनी तसेच रविवार आणि सोमवार असे तीन दिवस देहूत भाविकांची गर्दी होणार असल्याने संस्थान व्यवस्थापन सज्ज असल्याचे संत तुकाराम संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे यांनी सांगितले.

कार्तिकी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र देहूत भाविक, वारकरी, वैष्णव, दिंड्या तसेच परिसरात सुरू असलेले पारायण, सप्ताह, हरिनाम सोहळ्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते. तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्‍वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यास राज्यभरातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. हे भाविक श्री संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या दर्शनार्थ देहू-आळंदी करीत असतात. त्यामुळे संत तुकारामांचे दर्शन घेत हजारो वारकऱ्यांनी आज सकाळी देहूतून आळंदीकडे प्रस्थान ठेवले.

संत तुकाराम महाराजांच्या दर्शनानंतर वारकरी भाविक आळंदीकडे प्रस्थान ठेवतात, त्यांच्या सोयी सुविधांसाठी प्रशासन सज्ज होते. मंदिरात तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात होता. तसेच, वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट लावत अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आल्याने देहुत वाहतूक कोंडीचा प्रश्‍न जाणवला नाही. यात्रा काळात वारकऱ्यांचे स्वागतासह सुरक्षिततेची काळजी देवसंस्थानाकडून घेतली जात असल्याचे विश्‍वस्त संजय महाराज मोरे, काशिनाथ महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे यांनी सांगितले.

वाहतूककोंडी कायमच..
कार्तिकी यात्रा सुरू असताना देहू गावात मुख्य रस्त्यांवर उसाचे ट्रॅक्‍टर बंद पडणे, उलटणे, अवजड वाहनांसह आयटी पार्क व एमआयडीसीत काम करणाऱ्या चाकरमान्यांच्या वाढत्या चारचाकी वाहनांची वर्दळ तसेच रस्त्याच्या दुतर्फा पथारीवाले, हातगाड्या, उभी असणारी वाहने तसेच व्यवसायाची जाहिरात फलके आदी अतिक्रमणाने वाहतूककोंडी होत असते. यात्रेनिमित्त यावर नियंत्रण ठेवणे पोलिसांना कठीण जात असल्याचे यावेळीही अनुभवायला मिळाले. पोलिसांनी कारवाई करीत अतिक्रमण कायमस्वरूपी काढावे, अशी मागणी होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.