पुणे – अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबाबात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. त्यामध्ये लिहिलेल्या ओळींमध्ये “तुका म्हणे” हा शब्दाचा वापर केला आहे. या शब्दांवरून जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानने भूमिका घेतली असून अभिनेत्रीवर गुन्हा दाखल करण्याची देहू रोड पोलिस ठाण्यात निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात लिहिले आहे की, “सप्रेम जयहरी, अभिनेत्री केतकी चितळे यांनी काल समाजमाध्यमांत ‘तुका म्हणे’ या शब्दांचा वापर करून वादग्रस्त व विटंबनात्मक लेखन केले. श्री संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायाचे पूजनीय श्रद्धास्थान आहे. ‘तुका म्हणे’ ही संत तुकाराम महाराजांची नाममुद्रा असून महाराजांनी लिहिलेल्या सर्व अभंगांची स्वाक्षरी आहे. श्री संत तुकाराम महाराजच नव्हे तर देशातील सर्व संतांच्या नावांचा वापर करून जर कोणी असे वादग्रस्त व विडंबनात्मक लिखान करत असेल तर त्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी”, असे पत्र लिहून देहू संस्थानने अभिनेत्री केतकीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केल्याने अभिनेत्री केतकी चितळे अडचणीत आली आहे. तिला ठाणे सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. केतळी चितळे हिला शनिवारी रात्री कळंबोली पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर रविवारी सकाळी तिला सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून केतकी चितळेच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली. केतकी चितळे हिने कोणाच्या सांगण्यावरून ही फेसबुक पोस्ट टाकली, याचा शोध घ्यायचा आहे. त्यामुळे तिची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी गुन्हे शाखेकडून करण्यात आली होती. न्यायालयाने ही मागणी मान्य करत केतकी चितळे हिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. अभिनेत्री केतकी चितळेने केलेल्या वादग्रस्त पोस्टवर सर्वपक्षियांनी टीका केली आहे.