#wari2019 : तुकोबाराय निघाले पंढरीला !

संत तुकाराम महाराज पालखीचे देहूतून प्रस्थान
रामकुमार आगरवाल

श्रीक्षेत्र देहू – पांडुरंगाच्या भेटीची आस लागलेल्या वैष्णवांच्या भक्‍तीकल्लोळात जगद्‌गुरू संत तुकाराम महाराजांच्या 334 व्या पालखी सोहळ्याने सोमवारी (दि. 24) पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले. टाळ-मृदंगाचा गजर अन्‌ मुखी “तुकाराम तुकाराम’ असा अखंड नामघोष करीत भक्‍तीरसात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी प्रस्थान सोहळ्यात हरिनामाचे रंग भरले. आषाढी वारीसाठी राज्यभरातून आलेला वैष्णवांचा मेळा “ग्यानबा तुकाराम’चा जप करीत भक्‍तीचा मेळा पांडुरंगाच्या भेटीसाठी मार्गस्थ झाला. पहिला मुक्‍काम इनामदार वाडा येथे असल्याने देहूनगरीमध्ये भक्‍तीमय वातावरण आहे.

होईन भिकारी । पंढरीचा वारकरी ।।
हाचि माझा नेमधर्म । मुखी विठोबाचे नाम ।।
हेचि माझी उपासना । लागे संताच्या चरणा ।।
तुका म्हणे देवा । करीन ते भोळी सेवा ।।

आम्ही ज्याचे दास ।
त्याचा पंढरीये वास ।।

पंढरीची ओढ असणाऱ्या हजारो भाविक, भक्‍तांची पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून देहूत आगमन झाले होते. पालखी सोहळ्याची, वारीची परंपरा जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे सुपूत्र तपोनिधी नारायण महाराज यांनी 1685 मध्ये सुरू केली. वारीचे हे 334 वे वर्ष आहे. प्रस्थान सोहळ्याच्या निमित्ताने पहाटेपासूनच वारकऱ्यांची लगबग सुरू होती. पहाटे आटोपून इंद्रायणी नदी घाटावर स्नानविधीसाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मुख्यमंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी दर्शन बारीत रांगा लावल्या होत्या.
पहाटे पाच वाजता “श्रीं’ची, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात, विठ्ठल-रूक्‍मिणी मंदिरात पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. संजय मोरे, ह.भ.प काशिनाथ मोरे, ह.भ.प. अजित मोरे आणि संस्थांचे अध्यक्ष ह.भ.प. मधुकर मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

साडेपाच वाजता पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात आणि सकाळी सहा वाजता वैकुंठस्थान मंदिरात पालखी विश्‍वस्त ह.भ.प. संतोष मोरे, ह.भ.प. माणिक मोरे ह.भ.प. विशाल मोरे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. या वेळी संस्थानचे आजी-माजी अध्यक्ष, विश्‍वस्त, महाराजांचे वंशज आदी उपस्थित होते.

याल तरी यारे लागे । अवघे माझ्या मागे ।।
आजी देतो पोट भरी । पुरे म्हणाल तोवरी ।। हळुहळु चाला । कोणी कोणाशी ना बोला ।। तुका म्हणे सांडा घाटे । तेन नका भरू पोटे ।।

या अभंगाच्या गवळणीने सकाळी रामदास महाराज देहूकरांचे काल्याचे कीर्तन झाले. पालखी सोहळ्यानिमित्त सकाळी दहाच्या सुमारास सुरू झालेले अखंड हरिनाम सप्ताहाची दुपारी बारा वाजता रामदास महाराज मोरे (देहूकर) यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता झाली.

दरम्यान सकाळी अकरा वाजता भालचंद्र घोडेकर सराफ यांच्याकडील पॉलीश (झळाळी) करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराजांच्या पादुका परंपराप्रमाणे (म्हसलेकर) सोळंके कुटुंबियांनी डोक्‍यावर घेवून टाळ-मृदंगाच्या गजरात “ज्ञानोबा माऊली तुकाराम’चा हरिजपात दिंड्याच्या लवाजमात इनामदार वाड्यात आणल्या. दिलीप गोसावी यांच्या हस्ते पादुकांचे पूजन करण्यात आले. दुपारी साडेबाराच्या सुमारास सोळंके (म्हसलेकर) यांनी पादुका डोक्‍यावर घेवून टाळ मृदंगाच्या गजरात मुख्य मंदिर प्रदक्षिणानंतर भजनी मंडपात आणले.

दुपारी अडीच वाजता पालखी सोहळा प्रस्थान कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सोहळ्यातील चौथ्या क्रमांकाची दिंडीतील नवी पेठ (पुणे) येथील ज्येष्ठ वारकरी सदाशिव भोरेकर, कामगार व पुनर्वसन राज्यमंत्री बाळा भेगडे सपत्नीक, खासदार श्रीरंग बारणे, मुख्यमंत्री सचिवालयातील श्रीकांत भारतीय, उपजिल्हाधिकारी सचिन बारवकर, तहसीलदार गीता गायकवाड, पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, संस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे यांच्या हस्ते जगद्‌गुरूंच्या पादुकाचे महापूजा करण्यात आली.

ग्रामोपाध्याय नारायण अत्रे यांनी वेदमंत्राचे पठणाने, वरूण, कलश पूजन केले. माजी मंत्री उल्हास वनकर, बबनराव पाचपुते, बारामती पंचायत समितीचे सदस्य रोहित पवार, तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके, देहूचे सरपंच पूनम काळोखे, जिल्हा परिषदेचे सदस्य शैला खंडागळे, मंडलाधिकारी शेखर शिंदे, तलाठी मारुती पवार, अतुल गीते, पंचायत समितीचे माजी सदस्य सुहास गोलांडे, शिवसेनेचे सुनील हगवणे, पंढरपूर संस्थांचे विश्‍वस्त शिवाजी महाराज मोरे, भंडारा डोंगर दशमी समितीचे बाळासाहेब काशीद, सोहळा प्रमुख विश्‍वस्त, आजी-माजी विश्‍वस्त महेश मोरे, ग्रामपंचायत सदस्य दिंड्यांचे विणेकरी ग्रामस्थ आदी या वेळी उपस्थित होते. महापूजेनंतर पादुका पालखीत ठेवण्यात आल्या.

“पुंडलिका वरदा हरि विठ्ठल नामाचा जयघोष

मानकरी, विणेकरी यांचा फेटा, श्रीफळ देऊन संस्थानच्या वतीने सन्मान केल्यानंतर टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. मारुती लांडगे, गणेश शिंदे, अनिल गायकवाड, मल्हारी हगवणे, नामदेव भिंगारदिवे, अबु पवार, रतन लष्करे आदी खांदेकऱ्यांनी पालखी खाद्यांवर घेताच भाविकांनी पुंडलिका वरदा हरि विठ्ठल नामाचा जयघोष केले. पालखी मुख्य मंदिरातून बाहेर आणली. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पालखी मंदिर प्रदक्षिणा घालून पालखी मंदिराच्या बाहेर गेली. अग्रभागी अकलूजचे मोहिते-पाटील व बाभुळगावकर यांचे दोन अश्‍व, विणेकरी, टाळकरी, पखवाज वादक, दिंडीकरी, भाविक, वारकरी आदी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखी सोहळा देहूतील इनामदार वाड्यातील पहिल्या मुक्‍कामाकडे मार्गस्थ झाला. सायंकाळी साडेसहा सुमारास पालखी इनामदार वाड्यात विसावली. देहूरोड पोलिसांनी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त तैनात केला होता.

ठेव माझा मिराशी । ठाव तुझे पायापाशी ।।
याचा धरीन अभिमान । करीन आपुले जतन ।।
हा अभंग म्हणून संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या आरतीने सोहळ्याची सांगता झाली. इनामदार वाड्यात रात्री म्हातारबुवा खणेपुरीकर दिंडीचे कीर्तन झाले. त्यानंतर पहाटे सहा वाजेपर्यंत वेणुरकर दिंडीचा जागर सुरू होता. मंगळवारी सकाळी पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. रात्री पालखीचा मुक्‍काम आकुर्डी असणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.