क्षयरोग बाधित 117, कुष्ठरोगाचे 11 रुग्ण
पुणे महापालिकेतर्फे शोध अभियान : 4 लाख 43 हजार 513 जणांची तपासणी
पुणे – पुणे महापालिकेतर्फे शहरात राबवण्यात येणाऱ्या क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियानात आतापर्यंत 117 क्षयरोग, तर 11 कुष्ठरोग रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर औषधोपचार सुरू असून, हे अभियान डिसेंबर अखेरपर्यंत सुरू राहणार आहे.
करोनामुळे यंदा क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्णांचे निदान करून त्यांना तातडीने औषधोपचार सेवा पुरवण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेतर्फे हे अभियान सुरू आहे.
यांतर्गत 4 लाख 88 हजार 168 नागरिकांची तपासणीचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत 4 लाख 43 हजार 513 जणांची झाली आहे. त्यामध्ये क्षयरोगाचे 910 संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी 70 टक्के रुग्णांची थुंकी आणि एक्स-रे तपासणी मोफत करण्यात आली. त्यामध्ये 117 जणांना लागण झाली आहे.
कुष्ठरोग आणि क्षयरोगाचे तातडीने निदान आणि उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो. अन्यथा रुग्णाला रोगापासून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या गुंतागुंतीचा सामना करावा लागतो, तसेच त्याच्या सहवासातील अन्य निरोगी लोकांनाही त्याची लागण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या रोगाची लक्षणे जाणवणाऱ्या नागरिकांनी जवळच्या महापालिका रुग्णालयात तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
क्षयरुग्ण आणि कुष्ठरुग्ण शोध अभियान डिसेंबर अखेरपर्यंत राबवण्यात येणार आहे. जास्त दिवस खोकला, ताप, वजन कमी होणे, भूक न लागणे अशी क्षयरोगाची लक्षणे असल्यास तातडीने जवळच्या महापालिकेच्या किंवा खासगी रुग्णालयात तपासणी करून घ्यावी.
– डॉ. वैशाली जाधव, सहायक आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका
डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा