चाकण – जागेचा ताबा घेण्यावरून उफाळलेल्या वादानंतर सात जणांवर भाजपा उद्योग आघाडीच्या जिल्हाध्यक्षांना पेट्रोल ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर विरोधी गटाची तक्रार दाखल करण्याची कार्यवाही चाकण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
भाजपाचे पुणे जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष व विशाल उद्योग समूहाचे संचालक राजन मायाराम परदेशी (वय 55, रा. नेहरु चौक, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जुन्या पुणे – नाशिक रस्त्यावर चाकण गावच्या हद्दीत अमीर टॉकीजजवळ राजन परदेशी यांच्या मालकीची चार गुंठे जागा आहे. मंगळवारी (दि. 18) सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान परदेशी हे त्याठिकाणी जागेचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांची विरोधी गटासोबत बाचाबाची झाली. येथे परदेशी यांना त्यांनी शिवीगाळ, दमदाटी करून जाळून मारण्याचा प्रयत्न केला.
परदेशी यांच्या फिर्यादी वरून येथील पोलिसांनी महेश परदेशी, कांचन परदेशी, रोशन परदेशी, ओमप्रकाश परदेशी, राजेश परदेशी, रेश्मा परदेशी, प्रिती परदेशी (सर्व रा. आमिर टॉकीज समोर, नेहरु चौक, चाकण) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. विरोधी गटाची तक्रार मात्र रात्री उशिरापर्यंत चाकण पोलीस ठाण्यात नोंदविण्याचे काम सुरू होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार व त्यांचे अन्य सहकारी याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.