कर्नाटकच्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांच्याकडून 18 जुलै रोजी विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल, असे विधानसभेचे सभापती के.आर. रमेश यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेमध्ये विश्वास ठराव मांडला जाईपर्यंत अन्य कोणत्याही कामकाजामध्ये सहभागी होणार नाही, असे भाजपच्या सदस्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे गुरुवारपर्यंत विधानसभेचे अन्य काहीही कामकाज होणार नाही.
सभापतींचा सहभाग असलेल्या विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार कमिटीच्या बैठकीमध्ये अविश्वास ठरावाबाबत चर्चा झाली आणि 18 जुलै रोजी हा ठराव विधानसभेमध्ये मांडण्यात यावा, असा निर्णय झाला. कुमारस्वामी यांनी या ठरावासाठी शुक्रवारपर्यंतची मुदत मागितली होती. तर भाजपच्या सदस्यांनी हा ठराव मंगळवारीच मांडण्याचा आग्रह धरला होता. त्यामुळे दोन्हीमध्ये तडजोड म्हणून गुरुवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात यावा, असा निर्णय सभापती के.आर. रमेश यांनी जाहीर केला.