भामा- आसखेड योजनेवरच भिस्त

उपनगरांतील विस्तारित भागात पाण्यासाठी दाहीदिशा : पंचवीस वर्षांपूर्वीची योजना अपयशी
पुणे – शहराच्या पूर्व भागाचा पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी राज्य शासनाने पंचवीस वर्षांपूर्वी राबविलेली पाणीपुरवठा योजना सपशेल अपयशी ठरली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत शहराच्या जवळ असूनही या भागाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. विशेष म्हणजे रात्री उशीरापर्यंत जागरण करुन नागरिकांना जेमतेम पाणी मिळत आहे. त्यासाठी विविध प्रकारे आंदोलन करूनही प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही, त्यामुळे या भागातील नागरिकांना प्रस्तावित अशा “भामा आसखेड’ योजनेवरच भिस्त ठेवावी लागणार आहे.

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत शहराच्यालगत असलेल्या भागातील गावांना महापालिकेत समाविष्ट करण्याचा सपाटा राज्य शासनाने लावला आहे. मात्र, या गावांचा समावेश महापालिकेत करताना राज्य शासनाने त्यांच्या विकासाचे कोणतेही “व्हिजन’ ठेवलेले नाही. त्यामुळेच या गावांचा विकास होण्याऐवजी ही गावे भकास झाली आहेत. खराडी, चंदननगर, वडगांवशेरी, धानोरी, विश्रांतवाडी आणि कळस गावांमध्ये पहिल्यापासूनच पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. त्यामुळे या गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर पाण्याचा प्रश्‍न कायमस्वरुपी सुटेल, अशी नागरिकांची भाबडी अपेक्षा होती. मात्र, पाण्याचा हा प्रश्‍न सोडविण्यात प्रशासन आणि राज्य शासनालाही अपेक्षित यश आलेले नाही.

खराडी, चंदननगर आणि वडगांवशेरी या भागांना सध्या केवळ एक तास पाणीपुरवठा करण्यात येतो. विशेष म्हणजे हा पाणीपुरवठा कमी दाबाने असल्याने नागरिकांना विद्युत पंप सुरू केल्याशिवाय पाणीच येत नाही, त्यामुळे नागरिकांचे वीजबीलही वाढत आहे. यापेक्षाही वाईट अवस्था ही धानोरी, विश्रांतवाडी आणि कळस परिसराची आहे. या उपनगरांना दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे, सध्या उन्हाळयाच्या काळात तर हा पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने होत असल्याने नागरिकांच्या त्रासात आणखीनच भर पडली आहे. त्यामुळेच नागरिकांना टॅंकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली असून टॅंकर लॉबी अधिकच सक्रिय झाली आहे. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेऊन राज्य शासन आणि महापालिका प्रशासनाने या भागासाठी “भामा आसखेड’ ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्वाकांक्षी योजनेचे कामही सुरू झाले आहे. मात्र, या योजनेला अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. हे वास्तव असले तरीही ही योजना सुरू झाल्यास नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे, त्यामुळे या भागातील नागरिकांची भिस्त सध्या तरी या महत्वाकांक्षी योजनेवरच आहे.

लोहगावची अवस्था तर वाईटच…!

गेल्या काही वर्षांच्या कालावधीत लोहगावचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. या भागात नागरिकीकरणाचा वेग प्रचंड असल्यामुळे नागरिकांच्या समस्यांची भर पडली आहे. या भागाला आठ ते दहा दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे हा पाणीपुरवठाही बेभरवशी आहे. त्यामुळे नागरिकांना वापरण्यासाठी टॅंकरने तर पिण्यासाठी पाण्याचा जार घेण्याची वेळ आली आहे. गावाचा महापालिकेत समावेश होऊन दीड वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे, त्यामुळे पाण्याचा प्रश्‍न कधी सुटणार असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.