वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दोन ट्विट पोस्टना ट्विटरकडून प्रथमच “फॅक्ट चेक’चा सतर्कतेचा इशारा असलेले लेबल लावण्यात आले. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अमेरिकेच्या अध्यक्षांच्या निवडणुकीमध्ये ट्विटर हस्तक्षेप करायला लागल्याची टीका जगभरातून सुरू झाली आहे.
मंगळवारी ट्रम्प यांनी केलेल्या दोन ट्विटना ट्विटरकडून सतर्कतेचे लेबल लावण्यात आले होते. या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी टपालाद्वारे आलेल्या मतांमध्ये गैरव्यवहार होईल, असा दावा केला होता. मात्र, या ट्विटवर ट्विटरकडून संदिग्धतेचे लेबल लावले. ट्विटच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जाऊ नये, म्हणून संशयास्पद माहितीच्या ट्विटला “फॅक्ट चेक’चे लेबल लावण्याची उपाय योजना अलीकडेच सुरू करण्यात आली आहे. त्यानुसारच ट्रम्प यांच्या ट्विटला हे निळ्या रंगातील उद्गारवाचक चिन्हाचे लेबल लावले गेले.
ट्रम्प यांचे ट्विटरवर 80 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. यापैकी कित्येकांनी ट्विटरवर मुक्त विचारांवर दडपण आणण्याची टीका केली आहे. त्याबरोबर 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करत आहे. आपल्या दाव्याची पडताळणी सीएनएन आणि अमेझॉन वॉशिंग्टन पोस्टने केल्याची टीका ट्रम्प यांनी केली.
टपालाद्वारे होणाऱ्या मतदानातील गैरव्यवहाराचा मुद्दा ट्रम्प यांनी अलीकडच्या काळात वारंवार उपस्थित केला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेल्या कॅलिफॉर्निया, मिशिगन आणि अन्य राज्यांमध्ये करोनाच्या साथीमुळे टपालाद्वारे होणाऱ्या मतदानात गैरव्यवहाराचा आरोपही त्यांनी केला आहे.