ट्रम्प यांची थेरेसा मे यांच्यावर आगपाखड; म्हणे…

वॉशिंग्टन/ लंडन – वाचाळपणासाठी कुप्रसिद्ध असलेले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. ब्रिटनसाठी अतिमहत्वाच्या “ब्रेक्‍झिट’च्या संदर्भात युरोपियन संघाबरोबरच्या वाटाघाटी अतिशय ढिसाळपणे केल्याची टीका ट्रम्प यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर थेरेसा मे या पंतप्रधानपदावरून पायउतार होत आहेत, ही अतिशय चांगली बातमी असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

ट्रम्प प्रशासनाच्या अत्यंत महत्वाच्या केबल उघड झाल्या आहेत. या प्रकरणातील ब्रिटनचे अमेरिकेतील राजदूत किम दारोच यांना थेरेसा मे यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे ब्रिटनने काल पुन्हा एकदा स्पष्ट केले. दरोच हे थेरेसा मे यांचे पक्‍के समर्थक आणि ट्रम्प यांच्या धोरणांवर उघडपणे टीका करणारे आहेत. त्यामुळेच अमेरिकेत ते “नावडते’ आहेत. ब्रिटनने दरोच यांची पाठराखण केल्यानंतर लगेचच ट्रम्प यांनी ही आगपाखड केली आहे. ट्रम्प यांनी ट्विटरवर केलेली ही टीका खूपच बोचऱ्या शब्दातील आहे.

दरोच यांच्यावर आपण नाखूष असल्याचेही ट्रम्प यांनी पूर्वी म्हटले होते. ई-मेल उघड होण्यामागे दरोच यांचा हात असल्याचा आरोपही ट्रम्प प्रशासनाकडून केला जायला लागला आहे. दरोच यांनी तपासाला सहकार्य करावे म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जाऊ लागला आहे. मात्र दरोच यांच्यावर अविश्‍वास दाखवण्याचे काही कारण नाही, असे ब्रिटनने म्हटल्यामुळे अमेरिकेचा नाईलाज झाला आहे. ब्रिटनची परवानगी असल्याशिवाय दरोच यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करणे अमेरिकेला शक्‍य नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.