नवी दिल्ली – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत येणार्या पोलादावर अतिरिक्त 25 टक्के आहे आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाचा भारतावर किंवा भारतीय पोलाद कंपन्यावर फारसा परिणाम होणार नाही, असा दावा केंद्रीय पोलाद सचीव संदीप पौंडरिक यांनी केला आहे.
भारत पोलादाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करतो. मात्र भारतातच पोलादाला बरीच मागणी आहे. अमेरिकेला निर्यात केल्या जाणार्या पोलादाचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे भारतीय पोलाद उद्योगावर या निर्णयाचा फारसा परिणाम होणार नाही.
अमेरिकेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पौंडरिक यानी सांगितले की, भारत 145 दशलक्ष टन पोलाद निर्माण करतो. ही गेल्या वर्षाची आकडेवारी आहे. यातील बराच भाग भारतातील विविध उद्योग वापरतात. गेल्या वर्षी भारताने अमेरिकेला केवळ 95 हजार टन पोलादाची निर्यात केली. 145 दशलक्ष टनापैकी केवळ एक लाख टन पोलाद अमेरिकेला निर्यात होते.
त्यामुळे अमेरिकेला जरी पोलाद निर्यात केली नाही तरी भारताच्या एकूण उद्योगावर आणि कंपन्यावर याचा अत्यंत कमी परिणाम होणार असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते असे त्यांनी बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावेळी बोलताना सांगितले. भारताने निर्यात करण्याऐवजी सरलेल्या वर्षी आयात जास्त केली आहे. या वर्षात भारताने पोलादाची केलेली आयात 20 टक्क्यांनी वाढून 8.25 दशलक्ष टन इतकी झाली आहे.
भारतातच मागणी जास्त –
भारतातील पायाभूत सुविधा, बांधकाम क्षेत्र वेगाने वाढत आहे. भारताला पोलादाची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत भारतातील पोलाद कंपन्यानी तयार केलेले सर्व पोलाद भारताला लागू शकते. उलट आयात करण्याची गरज भासू शकते. त्यामुळे या आघाडीवर आम्ही फारशी चिंता करत नाही.
भारताने शुल्क लावले होते –
2018 मध्ये अमेरिकेच्या अध्यक्ष पदावर असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या पोलादावर शुल्क लावल्यानंतर त्यावेळी भारताने अमेरिकेच्या 29 वस्तूंवर आात शुल्क लावले होते. त्यामुळे पोलाद निर्यात कमी झाल्यामुळे जेवढे नुकसान झाले होते तेवढे नुकसान अमेरिकेतून होणार्या आयातीमधून भरून निघाले होते.