… अशी आहे ट्रम्प यांची रोमॅंटीक साइड

न्यूयॉर्क – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या पाच वर्षांपासून चर्चेत आहेत. आताच्या निवडणुकीत ते पराभूत झाले आहेत. मात्र हार मानण्यास ते तयार नाहीत. 20 जानेवारपर्यंत ते तांत्रिकदृष्ट्या अमेरिकेचे अध्यक्ष राहणार आहेत. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. मात्र सध्या तरी अमेरिकेत अधांतरी स्थिती आहे.

दरम्यान, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ट्रम्प यांचे खासगी आयुष्यही चर्चेत आले आहे. मध्यंतरी म्हणजे दोनच आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांच्या पत्नी मेलेनीया ट्रम्प त्यांच्यापासून घटस्फोट घेणार असल्याच्याही बातम्या होत्या. मात्र त्यास अधिकृत दुजोरा ट्रम्प यांच्या प्रवक्‍त्याकडून दिला गेला नाही.

असे असले तरी मेलेनीया या काही ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी नाहीत. त्याच्या अगोदर ट्रम्प यांनी दोन वेळा विवाह केला असून त्यांचा दोन वेळा घटस्फोटही झाला आहे.

ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नी इवाना या ऑलिंपियन होत्या. 1977 मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत. डोनाल्ड ट्रम्प ज्यूनियर आणि एरिक ट्रम्प ही त्यांची नावे. तसेच या जोडप्याला इवान्का नामक कन्याही आहे. ती गेल्या चार वर्षात राजकारणात ट्रम्प यांच्यासोबत सक्रिय होती.

राजकारणात येण्याच्या अगोदर आणि त्यानंतरही ट्रम्प यांचे नाव अनेक महिलांशी जोडले गेले. काही महिलांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोपही केले. मात्र या प्रकारांमुळे त्यांच्या वैवाहिक जिवनात कटूता निर्माण झाली व 1991 मध्ये ट्रम्प आणि इवाना वेगळे झाले.

यातली वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे जेव्हा ट्रम्प आणि इवाना यांची प्रथम भेट झाली तेव्हा इवाना विवाहीत होत्या. ट्रम्प यांच्याशी घटस्फोट घेतल्यानंतरही त्यांनी तीन विवाह केले.
मॉडेल मार्ला मॅपल्सशी ट्रम्प यांच्या कथित संबंधांच्या चर्चेने त्यावेळी त्यांचा घटस्फोट झाल्याचे बोलले गेले होते. मात्र हा घटस्फोट झाला अन 1993 मध्ये म्हणजे पहिल्या घटस्फोटानंतर दोनच वर्षात ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा मॅपल्सशी विवाह केला. या जोडप्याला टीफनी नामक कन्या असून चारच वर्षांत हे दोघे विभक्‍त झाले.

त्यानंतर मेलेनीया या ट्रम्प यांच्या आयुष्यात आल्या. ट्रम्प त्यावेळी 52 वर्षांचे होते, तर मेलेनीया केवळ 28 वर्षांच्या. एका कार्यक्रमात या दोघांची भेट झाली. विशेष म्हणजे ही भेट झाली त्यावेळी ट्रम्प हे कोणा अन्य महिलेसोबत त्या कार्यक्रमाला गेले होते.

मेलेनीया यांनी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीनुसार सुरूवातीला काही काळ भेटीगाठी झाल्यानंतर ट्रम्प आणि मेलेनीया 1999 पासून एकत्र राहु लागले. त्यानंतर त्यांचा ब्रेक अपही झाला.

तेव्हा ट्रम्प एका निवडणुकीत व्यस्त होते. मात्र त्यात पराभूत झाल्यानंतर ते पुन्हा मेलेनीया यांच्यासोबत दिसू लागले. अखेर 2005 मध्ये त्यांनी मेलेनीया यांच्यासमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला व दोघे विवाहबध्द झाले. त्यांना बॅरन नामक एक मुलगाही आहे.

आता निवडणुकीतील पराभवानंतर ट्रम्प यांच्या खासगी आयुष्यातही पुन्हा उलथापालथ होण्याची चर्चा सुरू झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.