लुसिआनाच्या निवडणुकीत ट्रम्प यांना धक्का

गव्हर्नरपदी डेमोक्रॅटिक पक्षाच्या जॉन बेल एडवर्डस्‌ यांची निवड 

वॉशिंग्टन: लुसिआनात पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचा गव्हर्नर निवडून आल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे. सध्या ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगाची कार्यवाही सुरू असून त्यांनी लुसिआनाच्या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता.

सध्या प्रतिनिधी गृहाकडून ट्रम्प यांच्याविरोधात महाभियोगासाठी पहिली जाहीर सुनावणी सुरू आहे. अशा वेळी ट्रम्प यांनी लुसिआनात ज्यांच्यासाठी प्रचाराचा जोर लावला होता, ते रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार एडी रिस्पोन पराभूत झाले आहेत. ते उद्योगपती आहेत. गव्हर्नरपदी जॉन बेल एडवर्डस्‌ हे निसटत्या बहुमताने निवडून आले आहेत. त्यांना 51.3 टक्के, तर पराभूत रिस्पोन यांना 48.7 टक्के मते मिळाली आहेत.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांची अनियोजित वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून 2020 मध्ये ते अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जात असतानाच ही तपासणी करण्यात आल्याने त्याची चर्चा सुरू झाली आहे. ट्रम्प हे तंदुरूस्त असून ते यापुढेही असेच उत्साही दिसतील, असे “व्हाइट हाऊस’ने या तपासणीनंतर म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.