वॉशिंग्टन – अमेरिकेमध्ये करोनाचे थैमान सुरू आहे. ही साथ हाताळण्यामध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी अत्यंत अव्यवस्थित नियोजन केले आहे. त्यांच्या या अयोग्य नियोजनाबद्दल माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ओबामा प्रशासनातील माजी अधिकाऱ्यांशी ओबामा यांनी फोनवरून केलेले हे संभाषण उघड झाले आहे. त्यातून ओबामा यांचा संताप व्यक्त झाला आहे.
ट्रम्प यांचे पहिले राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांच्याविरोधातील गुन्हेगारी प्रकरण रद्द केले गेले होते. त्याबाबतही ओबामा यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कायद्याचे राज्य या संकल्पनेची किमान समजच धोक्यात आली आहे, असे ते म्हणाले.
ओबामा प्रशासनाच्या काळात असलेल्या 3 हजार प्रशासकीय अधिकाऱ्यांना संबोधित करताना ओबामा यांनी या सर्व प्रशसकीय अधिकाऱ्यांना 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत जो बिडेन यांचे समर्थन करण्याचे आवाहन केले.
स्वार्थी, आदिवासी, विभाजीत आणि शत्रूभावनेने दुसऱ्यांकडे बघण्याच्या दीर्घकालीन प्रथेविरोधात आपल्याला संघर्ष करायचा आहे. ही प्रथा अमेरिकेत रुढ होऊ पहात आहे. त्याला विरोध करायला पाहिजे, असे ओबामा म्हणाले. केवळ माझेच खरे आणि अन्य प्रत्येक जणाशी काहीही कर्तव्य नाही, ही मानसिक अवस्था आपत्तीला निमंत्रण देणारी आहे, असे ओबामा म्हणाले.
केवळ चीनमधून येणाऱ्यांवर प्रवासबंदीमुळे अधिक मोठे नुकसान टाळले गेले आहे, असे ट्रम्प वारंवार म्हणत आहेत. ट्रम्प यांनी स्वतःच्या प्रशासनाबरोबर तुलना करताना ओबामा प्रशासनावरही टीका केली होती. अमेरिकेत 78 हजार जण कोविड-19 मुळे मरण पावले आहेत तर 1.3 दशाक्ष जणांना या रोगाची लागण झाली आहे.