अमेरिकेत सत्ताबदल शांततेत पार पडणार
वॉशिंग्टन – अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी अमेरिकेत सत्तेचे शांततेने हस्तांतरण होईल व अमेरिकेच्या नागरिकांनी त्याची अजिबात काळजी करू नये, असे त्या देशातील रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर मिच मॅककोनेल यांनी म्हटले आहे.
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेलद्वारे होणाऱ्या मतदानाबद्दल शंका उपस्थित केली आहे. तसेच अमेरिकेत सत्तांतर शांततेने होणार का, याबाबत बोलताना संभ्रम निर्माण करणारे विधान केल्यामुळे त्या देशात गदारोळ सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मॅककोनेल आणि अन्य रिपब्लिकन नेत्यांनी अमेरिकेच्या जनतेला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. मॅककोनेल यांनी आज सकाळी एका ट्विटमध्ये म्हटले की 3 नोव्हेंबर रोजी निवडणूक होते आहे. या निवडणुकीत जो कोणी विजयी होईल तो 20 जानेवारी रोजी पदावर स्थानापन्न होईल. 1972 पासून जी प्रक्रिया याबाबत पाळली जाते आहे, तसेच यंदाही होणार आहे.
करोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डेमाक्रॅटिक पक्ष आणि त्या पक्षाचे उमेदवार ज्यो बिडेन यांच्याकडून मेलद्वारे मतदान करण्यास प्रोत्साहन दिले जाते आहे. मात्र, मतदानाची ही प्रक्रिया विनाशकारी आणि कारस्थानी स्वरूपाची असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. आपल्या अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत त्यांनी सातत्याने वादग्रस्त विधाने केली आहेत व पुन्हा पुन्हा घुमजावही केले आहे.
मात्र, सूडाच्या राजकारणाच्या भीतीने त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मौन बाळगणेच श्रेयस्कर समजले, तर काही नेत्यांनी ट्रम्प यांना जाहीर विरोधही केल्याचे पाहायला मिळाले. आताही ट्रम्प मतदानाच्या ज्या प्रक्रियेवर संशय व्यक्त करत आहेत व त्यानंतर होणाऱ्या सत्तांतराबाबत भीती घालण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यावर त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी आम्ही गोंधळात तुमच्यासोबत नसणार असाच संकेत त्यांना दिल्याचे मानले जाते आहे.