टिकटॉक खरेदी करण्याच्या मायक्रोसॉफ्टच्या हालचाली
वॉशिंग्टन – टिकटॉक या प्रसिद्ध व्हिडिओ एन्टरटेनमेंट ऍपला खरेदी करणाचा विचार मायक्रोसॉफ्टकडून केला जात आहे, अशा बातम्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्यातच टिकटॉकवर अमेरिकेत लवकरात लवकर बंदी घातली जाईल, असे सूतोवाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
फ्लोरिडा येथून वॉशिंग्टनदरम्यानच्या हवाई प्रवासादरम्यान विमानातील पत्रकारांबरोबर ट्रम्प यांनी वार्तालाप केला. टिकटॉकवर अमेरिकेत बंदी घालण्यासाठी आपल्या आपत्कालिन आर्थिक अधिकारांचा वापरही करण्याची अथवा कार्यकारी अधिकारांच्या वापराची शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली.
“माझ्या हातामध्ये या ऍपवर बंदी घालण्याचे अधिकार आहेत. कार्यकारी अधिकारांमध्ये मी ते करू शकतो.’ असे ट्रम्प आपत्कालिन आर्थिक अधिकारांच्या संदर्भाने बोलताना म्हणाले. टिकटॉकचे अमेरिकेतील व्यवहार अमेरिकेतील एखाद्या कंपनीने विकत घ्यावे, यासाठी आपण अनुकूल नाही. टिकटॉकवर शनिवारपर्यंत बंदी घाअली जाईल, असे नियोजन आपण करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताने टिकटॉकसह 106 चिनी ऍपवर बंदी घातली आहे. त्याचे ट्रम्प प्रशासन आणि अमेरिकेतील खासदारांनीही स्वागतच केले आहे.